पुणे : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अंडी, केळी यासारखा पोषण आहार वाटप करण्यात येतो. गेल्या काही महिन्यांपासून शाळांना, केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना (सेंट्र्ल किचन) आहाराचे अनुदान वाटप करण्यात आलेले नाही.
आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाला प्रलंबित व चालू वर्षांतील या आहाराच्या अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुहुर्त सापडला असला तरी त्यानुसार शाळा, सेंट्र्ल किचनकडून प्रस्ताव मागवून ते प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे सादर करावे लागणार आहेत. सदर अनुदान मिळविण्यासाठी शाळांना अनेक काथ्याकुट करावी लागणार आहे.
राज्यातील अनेक जिल्हे आणि केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना अंडी व केळी यांचे अनुदान देणे प्रलंबित आहे. याकरीता वेळावेळी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे अनुदानाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याबाबतचे निर्देशही दिले आहेत. परंतु, याकरिता संपूर्ण माहिती सादर करावी लागणार आहे.
तर अनुदान देणार…
लाभार्थी विद्यार्थ्यांना अंडी, केळी या पदार्थाचा लाभ दिल्याची खात्री शाळांच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करुन घेण्यात येणार आहे, शाळा अथवा केंद्रीय स्वयंपकागृहाकरीता आवश्यक अनुदान आणि शाळांना यापूर्वी वितरीत अग्रीम रक्कम व उर्वरित अदा करावयाची फरकाची रक्कम याची माहिती घेऊनच अनुदान दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासणार…
शाळांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या नियमित आहाराची माहिती एम.डी. एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. फरकाची रक्कम वितरण करताना अनुदान मागणी करण्यात आलेल्या सर्व शाळा नियमितपणे एम.डी.एम पोर्टलवर दैनंदिन उपस्थितीची माहिती नोंदवित असल्याची खात्री तालुक्यामार्फत करून घेण्यात येणार आहे.
असे असतील निर्देश…
शाळास्तरावर नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत २०२३-२४ या कालावधीमध्ये नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीकरीता आठवड्यातील एक दिवस अंडी या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश देण्यात आले होते. २०२४-२५ या कालावधीमध्ये त्रिस्तरीय आहार रचनेप्रमाणे दोन आठवड्यातून एक वेळेस अंडा पुलाव या स्वरुपात अंडी या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश आहेत.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा