भाजपने पानभर जाहिराती दिल्या, पण आरोप मागे घ्या ; तीच खरी श्रद्धांजली – संजय राऊतांचा घणाघात…

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भाजपने वर्तमानपत्रांत पानभर जाहिराती दिल्याने राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
“भाजपने कमाल केली आहे. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, पण त्याचा उपयोग काय? केवळ जाहिराती देऊन श्रद्धांजली अर्पण होत नाही,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “अजित पवार यांच्यावर भाजप नेते, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले तब्बल ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेणे, हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.”
राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “जिवंतपणी आरोप करायचे, राजकीय लाभासाठी टीका करायची आणि निधनानंतर श्रद्धांजलीच्या जाहिराती द्यायच्या, ही दुटप्पी भूमिका आहे. जनतेला हे सर्व दिसत आहे.”
दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. भाजपकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat



