कुंजीरवाडीत खड्डा, फुटलेल्या लाईन्स अन् प्रशासनाची उदासीनता; माजी सरपंच सचिन तुपे यांचा आंदोलनाचा इशारा…

लोणी काळभोर, ता. ३१ : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या गॅस लाईनच्या कामामुळे पाणीपुरवठा, ड्रेनेज तसेच जलजीवन योजनेच्या पाईपलाईन्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही दुरुस्ती न झाल्याने कुंजीरवाडी परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सरपंच सचिन तुपे यांनी दिला आहे.
कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ गॅस लाईन टाकण्याचे काम सुरू असताना मोठा खड्डा पडला असून तो अद्यापही तसाच असल्याचा आरोप तुपे यांनी केला आहे. या कामादरम्यान पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि जलजीवन योजनेच्या लाईन्स फुटल्याने परिसरातील नागरिकांना दूषित पाणी, दुर्गंधी आणि गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
“प्रशासनाने काही दिवस काम थांबवले होते. मात्र त्यानंतर पुन्हा काम सुरू करण्यात आले. कामामुळे नुकसान झालेल्या लाईन्सची दुरुस्ती करणे ही संबंधित यंत्रणा आणि ठेकेदाराची जबाबदारी आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही,” असा आरोप तुपे यांनी केला.
फुटलेल्या लाईन्समधून सांडपाणी वाहत असल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
“नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याऐवजी प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?” असा सवाल उपस्थित करत तुपे यांनी पुढील आठ दिवसांत खड्डा बुजवून सुमारे ५०० मीटरपर्यंत नुकसानग्रस्त झालेल्या सर्व लाईन्सची दुरुस्ती करावी, अन्यथा कुंजीरवाडी ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ग्रामसेविका सविता भुजबळ म्हणाल्या की, “संबंधित गॅस लाईन कामाला वाहतूक विभागाची परवानगी आहे. त्या परवानगीशी ग्रामपंचायतीचा थेट संबंध नाही. कामादरम्यान पाईपलाईन्सचे नुकसान झाले असल्यास त्यासाठी संबंधित ठेकेदार जबाबदार असेल. आम्ही या संदर्भात वाहतूक विभागाकडे पाठपुरावा करणार आहोत. तसेच नुकसानग्रस्त लाईन्सची दुरुस्ती न झाल्यास संबंधित ठेकेदाराविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येईल.”
तसेच, स्वामी समर्थ मंदिराजवळील खड्ड्याबाबत माहिती आजच मिळाल्याचे सांगत, संबंधित बाबींची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुंजीरवाडीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्यांवर प्रशासन नेमकी कोणती पावले उचलते आणि नागरिकांच्या अडचणी कधी दूर होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat



