
कदमवाकवस्ती (वा.), दि. २ जून : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाठ टोल नाका परिसरात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी गेल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कवडीपाठ गुजरवस्ती येथील मोहन शंकर माळवदकर (वय ५२) यांचा मंगळवारी (दि. २) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन माळवदकर हे गेल्या सुमारे २० वर्षांपासून खाजगी पेंटर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते. आज सकाळी ते कवडीपाठ टोल नाका परिसरात पुणे–सोलापूर महामार्ग ओलांडत असताना माती भरून लोणी काळभोरच्या दिशेने जाणाऱ्या हायवा MH. 12YQ.7594 ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने हा भीषण अपघात घडला.
अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. माळवदकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनाने गुजरवस्ती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर कवडीपाठ परिसरातील नागरिकांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कारण याच टोल नाका परिसरात वारंवार अपघात होत असून, स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे सुरक्षाविषयक उपाययोजनांची मागणी केली होती. स्पीड ब्रेकर, रंबल स्ट्रिप, अलर्ट साईन बोर्ड, पादचारी मार्ग तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याबाबत निवेदने देण्यात आली होती. मात्र संबंधित यंत्रणांनी केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यापूर्वीही या परिसरात अनेक गंभीर अपघात झाले असून, अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी, वाहतूक विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना आजही जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, “कवडीपाठ टोल नाका हा अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. वारंवार अपघात होत आहेत, नागरिकांचे जीव जात आहेत; मात्र प्रशासनाला जाग येत नाही. प्रत्येक दुर्घटनेनंतर पंचनामा आणि आश्वासनांचा पाऊस पडतो, पण प्रत्यक्षात सुरक्षेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही.”
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा ह.भ.प. सुशील महाराज काळभोर अँड राहुल झेंडे, विशाल गुजर नितीन टिळेकर यांच्या सह छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली लवकरच जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, आवश्यक असल्यास पुणे–सोलापूर महामार्ग रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
नागरिकांनी खासदार डाँ. अमोल कोल्हे , आमदार माऊली कटके, जिल्हाधिकारी, एमएसआरडीसी, वाहतूक पोलीस विभाग आणि संबंधित प्रशासनाला थेट सवाल करत विचारले आहे की, “आणखी किती नागरिकांचे बळी गेल्यानंतर स्पीड ब्रेकर, रंबल स्ट्रिप आणि पादचारी सुरक्षेच्या सुविधा उभारल्या जाणार आहेत?”
कवडीपाठ टोल नाका परिसरातील वाढते अपघात आणि मोहन माळवदकर यांचा दुर्दैवी मृत्यू ही केवळ एक दुर्घटना नसून प्रशासनाच्या उदासीनतेचे गंभीर उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आता तरी संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात होणाऱ्या प्रत्येक दुर्घटनेची नैतिक जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
Editer sunil thorat





