नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण ; उरुळीकांचन पोलिसांत गुन्हा दाखल…

पुणे : नायगाव फाटा परिसरातील श्रेयस रोज नर्सरी येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली असून, उरुळीकांचन पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी (दि.२७ मे) गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत संदिप शामराव शिंदे (वय ४१, रा. श्रेयस रोज नर्सरी, नायगाव फाटा, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी हे दोघे कामावर असताना त्यांचा मुलगा पियुष संदीप शिंदे (वय १६ वर्षे १० महिने) हा घरी होता. घरातील लहान भावासोबत भांडण करू नको, असे आईने सांगितल्यानंतर पियुष कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला. त्याचा नातेवाईक व परिसरात शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही.
अपहरित मुलाचे वर्णन असे — उंची अंदाजे ४ फूट, रंग गोरा, अंगाने सडपातळ, अंगात पांढरा शर्ट, निळी जिन्स पॅन्ट, पायात निळ्या रंगाची सँडल असून डोक्यावर जुन्या जखमेची खूण आहे.
या प्रकरणी उरुळीकांचन पोलिसांनी बीएनएस कलम १३७(२) अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब मत्रे करत आहेत. प्रभारी अधिकारी सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Editer sunil thorat



