
कदमवाकवस्ती (वा.), ता. ३ : पुणे शहर पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले असून ११ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी (ता. २) रात्री उशिरा जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर लष्कर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप नागनाथ पवार यांची लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ अन्वये पोलीस आस्थापना मंडळ, शहर यांच्या बैठकीत या बदल्यांना मान्यता देण्यात आली. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या तात्पुरत्या पदस्थापनांचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी जारी केले असून संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होऊन कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने यांची फरासखाना पोलीस ठाण्यात, वाहतूक शाखेतील निरीक्षक रुणाल मुल्ला यांची डेक्कन पोलीस ठाण्यात, तर काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्यातील निरीक्षक अरुण घोडके यांची कोथरूड येथे, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस यांची कोंढवा येथे, गुन्हे शाखेतील निरीक्षक पंडित रेजितवाड यांची वानवडी येथे, तर निरीक्षक युवराज हांडे यांची लष्कर पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
याशिवाय डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांची काळेपडळ येथे, खडक पोलीस ठाण्यातील निरीक्षक संजय करनूर यांची नन्हे पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या व्यापक बदल्यांमुळे पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या नेतृत्वात बदल होणार असून कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांना अधिक सक्षम पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नव्या अधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
लोणी काळभोर परिसरात कार्यरत असताना वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या बदलीनंतर आता नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्याकडून गुन्हे नियंत्रणासह पोलीस प्रशासन अधिक प्रभावी करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Editer sunil thorat



