जिल्हासामाजिक

पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी; रात्री १० नंतर टपऱ्या, हॉकर्स आणि खाद्यपदार्थ विक्री बंद…

पुणे : शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोठा आणि कठोर निर्णय घेत पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे आता शहरातील रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाड्या, हॉकर्स आणि पानटपऱ्या रात्री १० वाजल्यानंतर पूर्णपणे बंद ठेवाव्या लागणार आहेत. पोलिसांच्या या निर्णयामुळे शहरातील रात्रीचे चित्रच बदलणार असून उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या चौपाट्या आणि टपऱ्यांवर निर्बंध येणार आहेत.

पुणे शहरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. विशेषतः रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या, चौपाट्या आणि पानटपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने अनेकदा किरकोळ वादातून गंभीर प्रकार घडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. अनेक ठिकाणी टोळक्यांची गर्दी, दादागिरी, हाणामाऱ्या, वाहनांची बेफाम गर्दी आणि नागरिकांना होणारा त्रास यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता.

याच पार्श्वभूमीवर आता शहरातील विविध चौपाट्या, गर्दीची ठिकाणे आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेषतः सारसबाग परिसर, नदीपात्र भाग आणि शहरातील विविध चौपाट्यांवरील खाद्यपदार्थ विक्री रात्री दहानंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिसांनी शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये नाकाबंदी वाढवली असून रात्री संशयास्पद वाहनांची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे अड्डे मानल्या जाणाऱ्या भागांमध्ये पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच रात्री विनाकारण फिरणाऱ्या टोळक्यांवरही पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.

पोलिस प्रशासनाच्या मते, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या टपऱ्या आणि स्टॉल्समुळे अनेकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. काही ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणे, वाहनांची रेसिंग, तरुणांकडून दादागिरी आणि महिलांना त्रास देण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने ही कारवाई आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे रात्री व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक टपरी चालक, हातगाडी व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा मुख्य व्यवसाय रात्रीच्या ग्राहकांवर अवलंबून असल्याने त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. “गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी सर्वसामान्य व्यावसायिकांवर निर्बंध घातले जात आहेत,” अशी नाराजी काही विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत माहिती देताना अमितेश कुमार यांनी सांगितले की, “शहरातील रस्ते, चौपाटी भाग आणि सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेते, हॉकर्स आणि पानटपऱ्या रात्री दहा वाजल्यानंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नियमांचे पालन करणाऱ्या हॉटेल, बार आणि पबना पूर्वीप्रमाणे मध्यरात्री दीड वाजेपर्यंत परवानगी राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”

पुणे पोलिसांच्या या निर्णयामुळे शहरातील रात्रीच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असून पुढील १४ दिवस शहरात कडक पोलिस बंदोबस्त, वाढीव गस्त आणि नाकाबंदी पाहायला मिळणार आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??