अजित पवार यांना बारामतीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप ; अश्रूंनी ओथंबलेल्या जनसागराची भावनिक उपस्थिती…

बारामती (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज, 29 जानेवारी रोजी बारामती येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, आज बारामतीत दुःख, अश्रू आणि आठवणींचा सागर उसळलेला दिसून आला. सकाळपासूनच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर समर्थक, कार्यकर्ते, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येने जमा झाले होते. “अजितदादा परत या”, “अजितदादा अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता, तर अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांनी दिल्लीतून शोकसंदेश पाठवत अजित पवार यांच्या कार्याची आणि नेतृत्वाची आठवण करून दिली. केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर राज्यांतील मंत्री आणि नेत्यांनीही बारामतीत येऊन श्रद्धांजली अर्पण केली.
या दुर्दैवी अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे खाजगी सुरक्षा रक्षक विदीप जाधव (PSO), फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्याच्या राजकारणासह संपूर्ण देश हादरून गेला आहे.
विकासकामांवरील पकड, स्पष्ट निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेले थेट नाते यामुळे ओळखले जाणारे अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. आज बारामतीत दिलेला हा अखेरचा निरोप केवळ एका नेत्यालाच नव्हे, तर एका युगालाही दिला जात असल्याची भावना उपस्थित प्रत्येकाच्या मनात दाटून राहिली.
Editer sunil thorat




