उरुळी कांचन पाटबंधारे विभाग सिंचन पाणीपट्टी वसुलीत ठरला अव्वल…

पुणे : उरुळी कांचन पाटबंधारे विभागाने तब्बल ४० लाख रुपयांची सिंचन पाणीपट्टीची वसुली करून उच्चांक गाठला आहे. शाखेच्या स्थापन वर्ष १९६९ पासूनची सर्वात जास्त सिंचन पाणीपट्टी वसुली झाल्यामुळे शाखाधिकारी, कर्मचारी यांचे परिसरात कौतुक होत आहे.
यवत चे उपविभागीय अभियंता एस. एम. साळुंखे आणि यवत अभियंता आर. के. पासलकर यांनी येथील शाखाधिकारी अर्चना जगताप तसेच गजानन डोंबाळे, महेश ढावरे, दिनेश देशमुख, अल्केश येड्रोवकर, स्वप्नील कुंजीर, सोनिया दुधाटे, सोमनाथ शितोळे या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
खडकवासला पाटबंधारे विभाग आणि यवत पाटबंधारे उपविभाग अंतर्गत उरुळी कांचन पाटबंधारे विभागाचे कामकाज चालते. १० किलोमीटर चा नवीन मुठा उजवा कालवा आणि १० किलोमीटरचा जुना मुळा -मुठा उजवा कालवा उरुळी कांचन पाटबंधारे विभागात येतो. उरुळी कांचन पाटबंधारे विभागाअंतर्गत २१ गावांचा समावेश आहे.
यामध्ये उरुळी कांचन, तरडे, शिंदवणे, अष्टापूर, शिंदेवाडी, खामगाव टेक, बिवरी, हिंगणगाव, टिळेकरवाडी, डाळींब, म्हातोबाची आळंदी, वळती आदीं गावांचा समावेश आहे. उरुळी कांचन पाटबंधारे विभागात ६ कर्मचारी कार्यरत आहेत. शाखाधिकारी अर्चना जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधून तब्बल ४० लाख रुपयांची सिंचन पाणीपट्टीची वसुली केली.
याबाबत माहिती देताना येथील शाखाधिकारी अर्चना जगताप म्हणाल्या, की खडकवासला अंतर्गत उरुळी कांचन पाटबंधारे विभागाचा सिंचन पाणीपट्टी वसुलीबाबत प्रथम क्रमांक आला आहे. तब्बल ४० लाख रुपयांची सिंचन पाणीपट्टीची वसुली करण्यात यश आले आहे. यामागे माझ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आहेत. सिंचन पाणीपट्टीची वसुली करताना सर्वच गावांतील शेतकऱ्यांनी खूप सहकार्य केले. वसुलीच्या दरम्यान शेतकऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वसुलीचे काम करण्यात आले.



