
लोणी काळभोर (पुणे) : मुसळधार पावसामुळे पूर्व हवेली लोणी काळभोर परिसरातील पाषाणकर बाग व महादेव मंदिर येथील ओढ्यावर मोठ्या प्रमाणात पूराचे पाणी आले. या पुरामुळे ओढ्यावरील दोन्ही पूल पाण्याखाली गेले व नागरिकांची ये-जा पूर्णपणे बंद झाली होती. अचानक बंद झालेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांनंतर आज सकाळपासून दोन्ही पुलांवरचे गाळ, झाडांच्या फांद्या व अडथळे हटविण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू झाली असून नागरिकांना आता सहजपणे ये-जा करता येत आहे.
या संपूर्ण कामाची पाहणी करताना लोणी काळभोर ग्रामपंचायत सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने पावले उचलल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले.
सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांनी यावेळी सांगितले की, “नैसर्गिक संकटाच्या काळात प्रशासन व ग्रामस्थांनी एकजुटीने काम केल्यास कोणतीही अडचण पार करता येते. नागरिकांनी धीर धरून सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.”
Editer sunil thorat





