उरूळी कांचन खून प्रकरण उघडकीस, आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखा व उरूळी कांचन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…

पुणे : उरूळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत सापडलेल्या २० वर्षीय युवतीच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा तपास अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखा व उरूळी कांचन पोलीस स्टेशनच्या पथकाने एक आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
ही धडाकेबाज कामगिरी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी (कोल्हापूर परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल (पुणे ग्रामीण) यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी उरूळी कांचन ते नायगाव रोडवरील प्रयागधाम हॉस्पिटलजवळील रस्त्यालगत एका युवतीचा मृतदेह आढळला होता. मृत युवतीचे नाव पुनम विनोद ठाकूर (वय २०, रा. गगन आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मुळ, ता. हवेली) असे असून तिच्या डोक्याला गंभीर जखम होती. घटनास्थळी तिचा मोबाईल, सॅक आणि चप्पल आढळल्या होत्या. तिच्या भावाने, मनिष ठाकूर (वय २३), उरूळी कांचन पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा क्र. २८३/२०२५ भा.दं.सं. ३०२ प्रमाणे खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासासाठी चार स्वतंत्र पथके नेमली. तपासादरम्यान ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि परिसरातील २०० ते २५० व्यक्तींशी चौकशी करण्यात आली. यामध्ये एका संशयित व्यक्तीची हालचाल लक्षात आल्यावर गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपीची ओळख पटविण्यात आली.
तपासात संशयित म्हणून समोर आलेला दिनेश संजय पाटोळे (वय २६, रा. गोळेवस्ती, उरूळी कांचन) यास अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने रस्त्याने चालत असलेल्या पुनम ठाकूरचा पाठलाग करून तिच्याकडे अश्लील मागणी केली. युवतीने नकार देत विरोध केल्यावर आरोपीने तिच्यावर झडप घालून डोक्यात दगड मारून खून केला, असे तपासात उघड झाले आहे.
आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH-12-SZ-6965) जप्त करण्यात आली असून न्यायालयाने आरोपीला २७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उरूळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, स.पो.नि. ज्ञानेश्वर बाजीगरे, सपोनि दत्ताजीराव मोहिते, तसेच अंमलदार अमित सिदपाटील, ईश्वर जाधव, सचिन घाडगे, आसिफ शेख, योगेश नागरगोजे, राजू मोमिन आणि सहकाऱ्यांनी केला. पुढील तपास उरूळी कांचन पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
Editer sunil thorat



