पुणे (हवेली) : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत राजरोसपणे सुरु असलेल्या दोन वेगवेगळ्या गावठी हातभट्टी दारू विक्रीच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली आहे. यामध्ये दुचाकीसह ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका परप्रांतीयाचा समावेश आहे.
सदर कारवाईत संभाजी चंद्रशीव काळे (वय २५, बाजार मैदानाजवळ, कुंजीर वाडी, ता. हवेली, जि. पुणे. मुळगाव बोरवंटी, ता. कळंब, जि. धाराशिव) व विरंबकुमार बाबुराम गौतम ( वय ३५, सध्या रा. कॅनॉल जवळ, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे. मुळ गाव महरौवा खजोरी, जोगीया जुरी, थाना बाटरगंज, तहसील बानूर, जि. वस्ती, राज्य उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी माहितीनुसार, कुंजीरवाडी परिसरात दोघेजण राजरोसपणे गावठी हातभट्टी दारू विक्री करीत आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिस पथकाने त्या ठिकाणी छापे टाकले. तेव्हा संभाजी काळे व विरंबकुमार गौतम हे दोघे हातभट्टी दारू जवळ बाळगून विक्री करताना आढळून आले. या धडक कारवाईत सुमारे ७ हजार ५०० रुपये किंमतीची ७५ लिटर तयार दारू व ५० हजार रुपये किंमतीची एक दुचाकी असा एकूण ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार तेज भोसले, आण्णा माने, सचिन सोनवणे, राहुल कर्डिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
मुख्य संपादक सुनिल थोरात
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा