जागेच्या वादातून पुतण्यांनी चुलत्याच्या डोक्यात कुदळ मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ; लोणी काळभोर…

पुणे : लोणी काळभोर सांडपाण्याच्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करताना झालेल्या जागेच्या वादातून तीन पुतण्यांनी चुलत्याच्या डोक्यात कुदळ मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रामकृषी कंपनीच्या पाठीमागे असलेल्या राहिंजवस्ती परिसरात रविवार (१३ एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर तीन जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी विलास किसन महानवर (वय ५९, रा. लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून युवराज विठ्ठल महानवर, अक्षय रामदास महानवर व अमित कैलास महानवर (सर्व रा लोणी काळभोर ता हवेली जि पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विलास महानवर यांच्या राहिंजवस्ती येथील घरातील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थीत होत नव्हता. म्हणून त्यांचा मुलगा राहुल, पत्नी शोभा यांच्या मदतीने ते घरासमोरील ड्रेनेजचा पाईप कुदळीच्या सहाय्याने साफ करत होते. साफ करत असताना, वरील तिन्ही पुतणे तेथे आले. आणी तुम्ही ज्या जागेत काम करत आहेत, ती जागा माझ्या वाट्याला आली असुन, तुम्ही येथे कोणतेही काम करायचे नाही. असे म्हणुन विलास यांच्या डोक्यात लोखंडी कुदळीने मारहाण करुन जखमी केले. मारहाण होत असल्याचे पाहून त्यांची पत्नी व मुलगा भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करू लागले. तेव्हा त्यांनासुद्धा शिवीगाळ करून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यानुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार योगेश कुंभार करीत आहेत.



