स्वच्छता संदेश देण्यासाठी विविध स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन ; मुख्याध्यापिका जीनत सय्यद..

पुणे (हडपसर) : रयत शिक्षण संस्थेच्या गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये गांधीतीर्थ स्वच्छ शाळा याअंतर्गत माहे सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२५ मध्ये विविध स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छतेचे महत्व आणि त्याविषयी जनजागृती असा या विविध स्पर्धा आणि उपक्रमांच्या मागील उद्देश होता.
या उपक्रमांची सांगता करण्यात आली. यामध्ये चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
तसेच हुतात्मा दिनाचे औचित्य साधून परिसराची स्वच्छता करण्यात आली. याशिवाय विद्यार्थिनी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून शाळेबाहेरील व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. प्रभात फेरी व जनजागृती फेरीचे ही आयोजन करण्यात आले होते. याशिवाय टाकाऊ पासून टिकाऊ कलात्मक वस्तू बनविण्याचा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी उपक्रम राबविण्यात आला होता. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.
तसेच स्वच्छता उपक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वच्छते सोबतच पर्यावरण आणि निसर्गाचे महत्त्वही या उपक्रमातून विद्यार्थ्यांना तसेच पालकांना समजून सांगण्यात आले. एक वाण निसर्गासाठी या उपक्रमांतर्गत माता पालकांना विविध प्रकारची रोपे भेट म्हणून देण्यात आली. अशा विविध उपक्रमातून स्वच्छता, स्वच्छतेचे महत्व, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपण याविषयीचा संदेश विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाज यामध्ये देण्याचा विद्यालयाने प्रयत्न केला.
या विविध स्पर्धांसाठी व उपक्रमांसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज़ीनत सय्यद यांनी मार्गदर्शन केले होते. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले होते.



