
पुणे (हडपसर) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने “स्पर्धा परीक्षांची ओळख व एम.पी.एस.सी. फाउंडेशन बॅच उद्घाटन समारंभ” बुधवारी, दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून हडपसर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप उपस्थित होत्या. अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. दिनकर मुरकुटे हे होते. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक अशा
मार्गदर्शनाचे मोलाचे सूत्र सांगितले. त्यांनी ठाम ध्येय, वेळेचे व्यवस्थापन, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास यावर भर दिला. “या चार बाबींवर विद्यार्थी लक्ष केंद्रित करतील, तर स्पर्धा परीक्षा पार करणं सहज शक्य आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिनकर मुरकुटे यांनी सध्याच्या तंत्रज्ञानयुक्त युगात विद्यार्थ्यांनी डिजिटल साधनांचा योग्य वापर करून यशाचा मार्ग शोधावा, असे आवाहन केले. “या फाउंडेशन बॅचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल आणि भविष्यात अनेक विद्यार्थी प्रशासकीय पदांवर विराजमान होतील,” असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. संजय जगताप यांनीही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या चेअरमन डॉ. छाया सकटे यांनी केला. आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. अजित भोसले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अमृता मुखेकर आणि प्रा. दिपक गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, शिक्षकवर्गाचीही उपस्थिती लक्षणीय होती. या उपक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची सखोल ओळख विद्यार्थ्यांना मिळणार असून त्यांच्या यशाचा पाया अधिक मजबूत होणार आहे.
Editer sunil thorat





