विवाहसोहळ्यातील १४ लाखांची चोरी! नववधूचे दागिने-रोख लंपास ; सीसीटीव्ही नसलेल्या मंगल कार्यालयावर प्रश्नचिन्ह…
विवाहसोहळ्यातील मोठी चोरी : नववधूसाठी ठेवलेले दागिने, रोख रक्कम आणि कागदपत्रांसह तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल लंपास...

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (हवेली) : पूर्व हवेली परिसरात लग्नसराईत सुरू असलेल्या चोरीच्या घटनांना आणखी एक भर पडली आहे. नवरदेवाच्या बहिणीच्या पायाजवळ ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांनी भरलेली बॅग चोरट्यांनी क्षणात लंपास केली. या बॅगेत चालू बाजारभावानुसार सुमारे १३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, १ लाख ५० हजार रुपये रोख, पैजण आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. एकूण १४ लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याने भगत कुटुंबीयांच्या आनंदसोहळ्यावर पाणी फिरले आहे.
फिर्यादी अच्युत भालचंद्र भगत (वय ६६, रा. पुणे-सातारा रोड) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील वृंदावन पॅलेस मंगल कार्यालयात घडली.
जेवणाच्या वेळी बॅग गायब…
विवाहसोहळ्यात नववधूस घालण्यासाठी खास तयार केलेले दागिने एका बॅगेत ठेवून भगत यांनी आपल्या मुलीकडे दिले होते. दुपारचे जेवण करताना तिने बॅग पायाजवळ ठेवली होती. परंतु जेवणानंतर बॅग उचलण्यासाठी हात घातला असता ती गायब असल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, पण बॅग मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, दिगंबर सोनटक्के आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, बॅगचा मागोवा लागत नसल्याने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
सीसीटीव्ही नसल्याचा मोठा प्रश्न…
वृंदावन पॅलेस येथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे उघड झाले असून त्यामुळे तपासात पोलिसांना मोठ्या अडचणी येत आहेत. लाखो रुपयांच्या भाड्याने उपलब्ध होणाऱ्या या हॉलमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही खातरजमा व कॅमेरे नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
१५ दिवसांत तिसरी मोठी चोरी…
पूर्व हवेलीतील मंगल कार्यालयांमध्ये गेल्या पंधरा दिवसांत चोरीच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत—
— ८ नोव्हेंबर – कुंजीर लॉन्स : सुनेसाठी ठेवलेले ७.५ लाखांचे स्त्रीधन चोरले
— १६ नोव्हेंबर – धनश्री लॉन्स : दोन पाहुण्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांच्या सोन्या-चांदीच्या चैन लांबवल्या
— २२ नोव्हेंबर – वृंदावन पॅलेस : नववधूसाठी ठेवलेले १४ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी नेला
— एकूण २४ लाखांहून अधिक किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याचे निष्पन्न झाले असून तीनही प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत.
पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह…
लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या मालामाल चोरींच्या मालिकेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोठी पोलिस यंत्रणा असूनही एकाही चोरीचा छडा लागला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. येणाऱ्या काळात अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा प्रशासनाचा इशाराही आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर करीत आहेत.
Editer sunil thorat



