लॅपटॉप चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांची शिताफीने अटक; जवळपास २ लाखांचा मुद्देमाल जप्त…

तुळशीराम घुसाळकर
पुणे (हवेली) : (ता.१३) हवेली तालुक्यातील वाघोली परिसरात लॅपटॉप चोरून पळून जाणाऱ्या एका परप्रांतीय अट्टल चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी कुंजीरवाडी येथे गस्तीदरम्यान जेरबंद केले. त्याच्याकडून १ लाख ९५ हजार ४२१ रुपये किंमतीचे पाच लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीचे नाव सागर नागराज (वय ३१, रा. महादनुर, ता. अंबुर, जि. वेल्लुर, तामिळनाडू) असे आहे. आरोपीविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.
संशयितावर पोलिसांचा हेरकैच…
बुधवारी (१३ ऑगस्ट) पोलिस अंमलदार चक्रधर शिरगिरे व शैलेश कुदळे हे गस्त घालत असताना, कुंजीरवाडी येथील चिंतामणी पार्क प्लॉटिंगजवळ एक व्यक्ती काळ्या रंगाची जड बॅग घेऊन संशयास्पदरीत्या उभा असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान बॅगमध्ये चोरीचे पाच लॅपटॉप आढळून आले. चौकशीत आरोपीने मंगळवारी (१२ ऑगस्ट) पहाटे वाघोली येथून हे लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली.
यशस्वी कारवाईचे श्रेय…
ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, तसेच पोलिस हवालदार गणेश सातपुते, रामहरी वणवे, तेज भोसले, अण्णा माने, संभाजी देवीकर, बापूसाहेब वाघमोडे, अंमलदार चक्रधर शिरगिरे, शैलेश कुदळे, बाजीराव विर, योगेश पाटील, सूरज कुंभार, प्रदीप गाडे, राहुल कर्डीले, सचिन सोनवणे, प्रवीण धडस यांच्या पथकाने केली.
Editer Sunil thorat



