
लोणी काळभोर (पुणे) : आज दिनांक १० ऑक्टोबर रोजी, लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत काळभोर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी राहुल दत्तात्रय काळभोर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देत दिलेला शब्द पाळण्याचे आणि राजकीय निष्ठेचे दुर्मिळ उदाहरण घालून दिले आहे.
प्रशांत काळभोर यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी तसेच अन्याय झालेल्या एका सहकाऱ्याला न्याय मिळावा या हेतूने राहुल काळभोर यांनी काही काळासाठी सरपंच पद भूषविले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावून आज स्वेच्छेने पदाचा राजीनामा दिला.
मुळात ग्रामपंचायतीत या गटाचे केवळ चार सदस्य निवडून आले होते, त्यामुळे सरपंच पद मिळणे अवघड वाटत होते. परंतु राहुल काळभोर यांच्या प्रभावी इच्छाशक्ती, सौम्य स्वभाव आणि नेत्यांप्रती असलेल्या अखंड निष्ठेमुळे ते सरपंच बनले.
सरपंच झाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकारी सदस्य नागेश काळभोर यांना दिलेला शब्द पाळत, आज आपल्या पदाचा सन्मानपूर्वक राजीनामा दिला.
या प्रसंगी भावना व्यक्त करताना प्रशांत काळभोर म्हणाले —
“आजच्या राजकारणात कट्टर, निष्ठावंत आणि विश्वासू सहकारी मिळणे दुर्लभ झाले आहे. राहुलसारखा कार्यकर्ता, सहकारी आणि मित्र लाभला, हे माझे भाग्य आहे. ‘बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले’ — या वचनाला साजेसं वर्तन आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आज दाखवून दिलं.”
प्रशांत काळभोर यांनी राहुल काळभोर यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांचे गावासाठीचे योगदान, निष्ठा आणि प्रामाणिकता कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
Editer sunil thorat



