पुणे (शिरुर) : आंधळगाव सादलगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे बांधकाम पाडून नवीन बांधकाम करण्याबाबत ग्रामपंचायतीने सोमवारी (ता.१३) आयोजित केलेली विशेष ग्रामसभा प्रामुख्याने वादळी ठरली.
सादलगाव येथे सद्यःस्थितीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पाडून त्या ठिकाणी नवीन मंदिर बांधकामाचा निर्णय गावातील काही ग्रामस्थांनी घेतला. मंदिर बांधकामासाठी लोकवर्गणीतून यात्रेच्या दहापट वर्गणी काढण्याचा निर्णय घेतला गेला. यावेळी गावातील देविदास होळकर, भाऊसाहेब गायकवाड, पांडुरंग होळकर, दत्तात्रेय केसवड, रोहिदास होळकर या ग्रामस्थांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. त्यांनी तत्काळ शिरूर पोलिस निरिक्षक, तहसीलदार शिरूर व गटविकास अधिकारी शिरूर यांच्याकडे तत्काळ या निर्णयाविरुद्ध तक्रार केली. दरम्यानच्या काळात विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती मंदिरामधून हलविली. हा प्रकार घडल्यानंतर धार्मिक भावना दुखविल्यामुळे गावातील पाच ग्रामस्थांनी यावर नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व वर्गणीवर पुन्हा एकदा विचार व्हावा, यासाठी गावातील ग्रामसभेला उद्देशून आपले मुद्दे एका बॅनरद्वारे जाहीर करून जनतेला ‘उघडा डोळे आणि बघा नीट’ असा संदेश देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
या मुद्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसेविका सुशीला झाडगे यांनी मागील सभेचे अहवाल वाचन केले. अध्यक्षस्थानी सरपंच अविनाश पवार हे होते. मंदिर बांधकाम हा सभेपुढील मुख्य विषय असतानाही त्यामध्ये काही ग्रामस्थांनी मागील काही वर्षांतील जुने मुद्दे उपस्थित करून मंदिराच्या वर्गणीला विरोध करणाऱ्यांची बोलती बंद केली. मंदिराच्या वर्गणीला विरोध करणाऱ्यांनी आधी त्यांच्याकडे असलेल्या रकमेचा गावापुढे हिशोब द्यावा, मगच ग्रामसभेत बोलावे, असा आक्रमक पवित्रा काही ग्रामस्थांनी घेतला होता. तर बॅनरद्वारे आम्ही सर्व हिशोब यापूर्वीच गावापुढे मांडलेला आहे, असे ग्रामस्थ भाऊसाहेब गायकवाड यांनी सांगितले.
मंदिर बांधकामाच्या वर्गणीला विरोध दर्शविणाऱ्या ५ ग्रामस्थांपैकी ४ ग्रामस्थांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली. ग्रामसभेत एकमताने सर्व विषयांना मंजुरी दिली. ग्रामसभेत काही ग्रामस्थांकडून एकमेकांवर भिडण्याचा प्रकार घडल्याने मंदिर बांधकामाबाबत ग्रामसभेत घडलेल्या घटनेबाबत गावभर चर्चेला मोठे उधाण आले आहे.
कांतिलाल होळकर, संतोष जगताप, हरिभाऊ चांदगुडे, अविनाश साळुंके यांच्यासह अनेक नागरिकांनी चर्चेत सहभाग घेतला. या ग्रामसभेला मांडवगण फराटा पोलिस ठाण्याचा चोख बंदोबस्त होता. यावेळी मानसिंग होळकर, दिव्या कारकूड, संजय पवार आदी उपस्थित होते.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा