डॉ. गजानन टिंगरे
पुणे (इंंदापुर) : इंदापूर शहरातील वाहतूक कोंडी, तसेच पार्किंगची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर स्वरूप धारण करत आहे. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत आहे.
शहरात पार्किंगसाठी अधिकृत जागा नसल्याने दुचाकी व चार मोटारींचे पार्किंग कोठे करायचे? याचे उत्तर कोणाकडेच नाही. याचा परिणाम म्हणून वाहने रस्त्यातच उभी केली जात आहेत. यामुळे इंदापूर शहरातील पार्किंग समस्येवर योग्य नियोजन करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याच वेळी वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी नागरिकांनीही नियम पाळत पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
इंदापूर शहराची लोकसंख्या, तसेच विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे. त्याच धर्तीवर गेल्या १०-१२ वर्षांत शहरातील दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांची संख्या अत्यंत वेगाने वाढली. दुसरीकडे रस्त्यांची लांबी, रुंदी तशीच आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनालाही सहन करावा लागत आहे. अनेकवेळा चौकाचौकात वाहतूक पोलिस उभे राहून वाहतूक सुरळीत करतात. प्रश्न आवाक्याबाहेर गेल्यावर रस्त्यात उभ्या केलेल्या वाहनांना दंडही ठोठावतात. मात्र, अशाने वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार नाही. यासाठी सर्वप्रथम शहराच्या काही भागांमध्ये नगर परिषदेकडून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच रस्त्यावर, फुटपाथवर झालेली अतिक्रमणे हटविणे आवश्यक आहे. तरच वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.
यासाठी नगर परिषद, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वांमध्ये समन्वय होणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडी खडकपुरापासून नेहरू चौकापर्यंतचे मुख्य बाजारपेठ पुणे-सोलापूर महामार्गावरील बाबा चौक, बस स्थानकासमोरील चौक इंदापूर न्यायालयासमोरील चौक, श्री नारायणदास रामदास महाविद्यालयासमोर इंदापूर महाविद्यालयाच्या समोर, आठवडे बाजाराच्या दिवशी इंदापूर महाविद्यालय ते दर्गा मशीद चौकापर्यंतच्या ४० फुटी मार्ग या उपाययोजना करणे आवश्यक पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे आठवडे बाजारादिवशी विक्रेते रस्त्यावर माल विक्रीसाठी येणार नाहीत किंवा आठवडे बाजारात चारचाकी वाहने जाणार नाहीत याची काळजी घेणे, पदपथावरील अतिक्रमणे हटविणे नव्या इमारतींना पार्किंग असल्याशिवाय परवानगी न देणे, मुख्य बाजारपेठेत एकेरी वाहतूक करणे, व्यापाऱ्यांना विश्वासात घेत वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करणे नगरपालिका, पोलिस, व्यापाऱ्यांनी एकत्रित बसून मार्ग काढणे, शहरातून होणारी अवजड वाहतूक बाह्यवळण मार्गावरून वळविणे, बस स्थानक परिसर अतिक्रमण मुक्त करणे,
रमेश ढगे, मुख्याधिकारी, इंदापूर नगर परिषद
इंदापूर शहरातील अनेक मार्गांवर अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होते. याचा परिणाम म्हणून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे लवकरच संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन पोलिस प्रशासन व नगरपरिषदेच्या संयुक्त पथकाद्वारे संबंधित अतिक्रमणे जमीनदोस्त करू आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होईल यासाठी प्रयत्न करू.
सूर्यकांत कोकणे, पोलिस निरीक्षक, इंदापूर
इंदापूर शहरातील वाहतूक कोंडी व अवैध पार्किंगबाबत वारंवार तक्रारी येत असतात. यामुळे शहरासाठी वाहतूक पोलिसांच्या नेमणुका करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करीत अवैध पार्किंग केलेल्या वाहनांना दंड करण्यात येत आहेत. यासह शहरातील अतिक्रमणाच्या मुद्द्याबाबत नगर परिषदेला मागणीप्रमाणे आवश्यक तेवढे पोलिस बळ पुरवू अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करू.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा