महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय : राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि आस्थापना राहणार २४ तास खुली; मद्यविक्री आस्थापना मात्र बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील व्यापार, अर्थव्यवस्था आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स आणि विविध आस्थापना आता २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. यामुळे व्यापारी, हॉटेल व्यवसायिक तसेच पर्यटकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
मात्र, या निर्णयामध्ये काही आस्थापनांना अपवाद ठेवण्यात आला आहे. मद्यविक्री आणि मद्यपुरवठा करणारी आस्थापना जसे की मद्यपान गृहे, परमिट रूम, देशी बार, हुक्का पार्लर, डान्सबार आणि डिस्कोथेक या २४ तास सुरू ठेवता येणार नाहीत. या आस्थापनांसाठी पूर्वीप्रमाणेच शासनाने निश्चित केलेल्या वेळेचेच पालन करावे लागेल.
कायदा आणि नियमावलीनुसार निर्णय…
हा निर्णय महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकर्यांचे व सेवासंबंधी नियमन) अधिनियम, २०१७ अंतर्गत घेण्यात आला आहे.
या अधिनियमाच्या कलम २१(२) नुसार “दिवस” म्हणजे मध्यरात्रीपासून सुरू होणारा २४ तासांचा कालावधी आहे. तर कलम १६(१)(ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस खुली ठेवता येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे.
तथापि, कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची तरतूद देखील यात आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून किमान २४ तास सलग विश्रांती मिळणे बंधनकारक असेल. तसेच साप्ताहिक सुट्टी देणे नियोक्त्यांसाठी अनिवार्य असेल.
मद्यविक्री आस्थापनांसाठी वेगळे नियम…
२०१७ मध्ये शासनाने काढलेल्या अधिसूचनेद्वारे परमिट रूम, बार, डान्सबार, हुक्का बार, डिस्कोथेक, थिएटर्स व सिनेमागृहांसाठी सुरू आणि बंद करण्याचे वेळापत्रक निश्चित केले होते. यानंतर २०२० मध्ये काढलेल्या नवीन अधिसूचनेत थिएटर्स व सिनेमागृहांना या निर्बंधातून वगळण्यात आले. सध्या केवळ मद्यविक्री व मद्य पुरविणाऱ्या आस्थापनांसाठी मर्यादित वेळेचे नियम लागू राहणार आहेत.
स्थानिक प्रशासन व पोलीसांची भूमिका…
राज्यातील विविध भागांमधून स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाकडे मद्यविक्री आस्थापना २४ तास सुरू ठेवण्याबाबत मागण्या येत असल्या तरी, शासनाने त्या तक्रारींचा विचार करून अशा आस्थापनांवर पूर्वीचेच नियम काटेकोरपणे लागू राहतील, असा निर्णय घेतला आहे.
नागरिक आणि व्यापार जगतावर परिणाम…
या निर्णयामुळे —-
—व्यवसाय व अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
—पर्यटन क्षेत्रासाठी सकारात्मक बदल होईल.
—शहरी भागात २४ तास दुकाने व खाद्यगृहे खुली राहिल्याने नागरिकांना सुविधा मिळतील.
—तसेच कर्मचारी वर्गासाठी विश्रांती व सुट्टीची हमी कायद्यातून दिली गेली आहे.
अधिकृत माहिती उपलब्ध…
शासनाचा हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Editer sunil thorat



