खळबळजनक! वैद्यकीय अधिकाऱ्याकडून शरीरसुखाची मागणी? छळाला कंटाळून परिचारिकेचा आत्महत्येचा प्रयत्न…

गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य विभागाला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सतत शरीरसुखाची मागणी, दडपशाही व वेतनवाढ रोखून धरल्याच्या आरोपाने त्रस्त झालेल्या कंत्राटी परिचारिकेने ६ डिसेंबर रोजी संध्याकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. परिचारिका सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
संबंधित परिचारिकेच्या पतीने दोन वर्षांपासून सुरू असलेल्या छळाचा, वेतनवाढ रोखण्याचा आणि अश्लाघ्य मागण्यांचा थेट आरोप संबंधित वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यावर केला आहे. मात्र, दबाव व भीतीच्या वातावरणामुळे त्यांनी अद्याप अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही. या प्रकरणामुळे आरोग्य विभागातील अनियमितता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, पाच महिन्यांपूर्वी याच अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे मुलचेरा तालुक्यात पाच डेंगू रुग्णांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. त्या वेळीही कोणतीही कारवाई न झाल्याने आरोग्य यंत्रणेतील असंतोष अधिक वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. नवीन प्रकरण उजेडात येताच वादग्रस्त अधिकाऱ्याविरोधात कडक पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
घटनेच्या दिवशी परिचारिकेने दिवसभर काम करून संध्याकाळी मुलचेरा येथील घरी परतल्यानंतर ती तणावात दिसत असल्याचे पतीने सांगितले. रात्री जेवणानंतर पती झोपी गेल्यावर तिने विषारी द्रव प्राशन केले. ही बाब लक्षात येताच पतीने तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेनंतर जिल्हा परिषद सीईओ सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी ७ डिसेंबरला रुग्णालयात भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली. “पतीकडून चॅटिंगसंदर्भातील माहिती मिळाली आहे. शासनाला सविस्तर अहवाल पाठविण्यात येणार आहे,” असे गाडे यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनीही, “परिचारिकेवर उपचार सुरू आहेत. त्या बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांचे पती तक्रार देऊ शकतात. संबंधित अधिकाऱ्यांविषयी माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. योग्य ती कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट केले.
या धक्कादायक घटनेमुळे आदिवासीबहुल आणि नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा गंभीरपणे पुढे आला आहे. प्रशासन कोणती कारवाई करते आणि आरोपी वैद्यकीय अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित होते का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat



