छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण, मेट्रोच्या माध्यमातून कोंढवा परिसर पुण्याच्या मुख्य प्रवाहाशी जोडणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
कात्रज–कोंढवा रस्त्याचे काम गतीने पूर्ण होणार...

पुणे : कोंढवा परिसराचा पायाभूत विकास वेगाने करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून कात्रज–कोंढवा मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. मेट्रोच्या माध्यमातून कोंढवा परिसर पुणे शहराच्या इतर प्रमुख भागांशी जोडण्यात येणार आहे. शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रो मार्गाला मान्यता देण्यात आली असून स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्ग कोंढव्यापर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच प्रस्तावित पुरंदर विमानतळाशी जोडणाऱ्या मेट्रो मार्गातूनही कोंढवा परिसराला जोडण्यात येईल, असे ठाम प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कोंढवा बुद्रुक येथे श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, चेतन तुपे, मंडळाचे पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धा नव्हते तर ते एक दूरदृष्टी असलेले महान राज्यकर्ते होते. त्यांनी समतेवर आधारित, लोककल्याणकारी व न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली. स्त्रियांवर अन्याय व अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देणारे त्यांचे राज्य होते. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोंढव्याच्या भूमीवर त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण होत असल्याचा अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले.
पुतळ्यामुळे केवळ कोंढवा बुद्रुक परिसराचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. हा पुतळा भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
इतिहासाचा संदर्भ देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्या काळात मोगलशाही, निजामशाही व आदिलशाहीसारख्या परकीय सत्तांनी मराठी भूमीवर आणि हिंदुस्थानावर आक्रमणे केली होती, त्या काळात अनेक स्थानिक राजे परकीय सत्तांचे मांडलिक बनले होते. अशा कठीण परिस्थितीत राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. अठरापगड जातीतील समाजघटकांना एकत्र आणून त्यांनी स्वराज्याची मजबूत पायाभरणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध पराक्रमाने लढा देत स्वराज्याचे संरक्षण केले. पुढे महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सातत्याने संघर्ष सुरू ठेवत दिल्लीचे तख्त काबीज केले आणि अटकेपार भगवा झेंडा फडकावला. हा इतिहास प्रत्येक भारतीयाला अभिमानाने मान उंचावणारा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी सीबीएसई अभ्यासक्रमात त्यांच्या जीवनकार्याचा आणि पराक्रमाचा २१ पानांचा समावेश करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
यावेळी आमदार योगेश टिळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोंढवा परिसरात त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून कोंढवा परिसराचा सर्वांगीण पायाभूत विकास सुरू असून रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा व इतर नागरी सुविधांमध्ये लवकरच लक्षणीय सुधारणा दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Editer sunil thorat





