शिक्षण विभागाचा अफलातून निर्णय! मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षक नोडल अधिकारी; शिक्षक संघटनांचा तीव्र संताप…

अकोला : गुरूची महती हीच खरी भारतीय संस्कृती असे मानले जाते. मात्र महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शिक्षकांच्या मूळ भूमिकेलाच तिलांजली दिली जात असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. राज्याच्या शिक्षण संचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार आता शासकीय तसेच खासगी शाळांतील शिक्षकांना मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले जाणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षक वर्गात तीव्र असंतोष पसरला असून, शिक्षक संघटनांनी याला थेट शिक्षकांचा मानसिक छळ ठरवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शासनाच्या या आदेशानुसार प्रत्येक शाळेतून एका शिक्षकाची नियुक्ती “भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन, नियमित देखरेख व तपासणी” या विषयासाठी करण्यात येणार आहे.
संबंधित शिक्षकाचे नाव व संपर्क क्रमांक शाळेच्या दर्शनी भागात फलकावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नोडल शिक्षकावर आपल्या शाळेच्या परिसरात तसेच आजूबाजूच्या भागात मोकाट कुत्रे कुठे फिरतात, कुठे व किती संख्येने जमा होतात, कोणत्या भागात त्यांचा उपद्रव अधिक आहे, कुत्रे विशिष्ट ठिकाणी का एकत्र येतात याचे निरीक्षण करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. म्हणजेच वर्गात अध्यापन करण्याऐवजी शिक्षकांना प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कुत्र्यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्याचे काम करावे लागणार आहे.
या निर्णयामागे मोकाट कुत्र्यांमुळे होणारे हल्ले, रेबीजचा वाढता धोका आणि त्यामुळे होणारे मृत्यू ही कारणे पुढे करण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी सक्त उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने काही निर्णय घेतले आणि त्याचाच कित्ता गिरवत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने थेट शिक्षकांवर ही जबाबदारी टाकल्याचे चित्र आहे.
मात्र या निर्णयावर शिक्षक संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. महानगरपालिका, नगर परिषद आणि जिल्हा परिषदांकडे यासाठी स्वतंत्र पशुवैद्यकीय विभाग, प्रशिक्षित कर्मचारी आणि यंत्रणा असताना शिक्षकांना या कामात जुंपणे म्हणजे प्रशासनाने आपल्या अपयशाची जबाबदारी शिक्षकांवर ढकलल्यासारखे असल्याचा आरोप होत आहे. आधीच निवडणूक प्रक्रिया, जनगणना, विविध सर्वेक्षण, शालेय पोषण आहार, कोविडसारख्या आपत्कालीन मोहिमा आणि इतर अनेक अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांवर प्रचंड ताण आहे. त्यात आता मोकाट कुत्र्यांच्या देखरेखीची नवी जबाबदारी लादणे म्हणजे शिक्षकांच्या मूळ शैक्षणिक कामावर घाला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी या आदेशाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “भटक्या कुत्र्यांच्या मागे शिक्षक लावणे म्हणजे शिक्षण व्यवस्थेची थट्टा आहे. शिक्षक वर्गात शिकवणार की रस्त्यावर कुत्रे मोजणार? विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या गुरूंना अशा कामात गुंतवणे हे मानसिक छळ करणारे आहे. हा आदेश तात्काळ रद्द झाला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिक्षकांचा वेळ, ऊर्जा आणि लक्ष हे अध्यापनापेक्षा अशैक्षणिक कामांकडे वळल्यास शैक्षणिक गुणवत्ता घसरण्याचा धोका आहे. ‘भटक्या कुत्र्यांच्या मागे शिक्षक’ ही नवी भूमिका शिक्षण व्यवस्थेला नेमकी कोणत्या दिशेने नेत आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
एकीकडे शासन गुणवत्तापूर्ण शिक्षण, नवे अभ्यासक्रम आणि डिजिटल शिक्षणाचा गजर करत असताना दुसरीकडे शिक्षकांना कुत्र्यांच्या देखरेखीच्या कामात जुंपणे हे परस्परविरोधी धोरणाचे उदाहरण असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा आदेश तात्काळ मागे घ्यावा आणि भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणांनाच जबाबदारी द्यावी, अशी जोरदार मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.
Editer sunil thorat



