
पुणे : प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमा कोरेगाव येथील जयस्तंभ कार्यक्रमाचे नियोजन पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने अत्यंत काटेकोर, शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने करण्यात आले होते. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षिततेसह आरोग्य, पाणी, स्वच्छता व आपत्कालीन सेवा या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून नियोजन करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
केवळ कार्यालयीन बैठका न घेता, जिल्हा परिषद प्रशासनाने प्रत्यक्ष पेरणे कार्यक्षेत्रात जाऊन पाहणी केली. यावेळी सर्व जिल्हास्तरीय विभागप्रमुख, नोडल अधिकारी, हवेली व शिरूर तालुक्यांचे गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय विभागप्रमुख, विस्तार अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीदरम्यान स्तंभ परिसरात एक-दोन नव्हे तर तब्बल सहा समन्वय बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक विभागाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करून सूक्ष्म पातळीवर नियोजन करण्यात आले व त्यानुसार मार्गदर्शन देण्यात आले.
आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांच्या कुशल नेतृत्वाखाली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक साळुखे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा सूक्ष्म कृती आराखडा तयार केला. या आराखड्याची अंमलबजावणी सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केली.
जयस्तंभ परिसर व मार्गांवर २३ आरोग्य बुथ उभारण्यात आले होते. यामधून १३६ वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा दिली. ३३ अॅडव्हान्स व बेसिक रुग्णवाहिका कार्यक्रमस्थळी तत्परतेने सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन ९ खासगी रुग्णालयांमधील १२१ बेड आधीच आरक्षित करण्यात आले होते.
या संपूर्ण व्यवस्थेतील सर्वात विशेष बाब म्हणजे अतिशय कमी कालावधीत जयस्तंभाच्या नजीक ३ बेडचे आयसीयू उभारण्यात आले. या आयसीयूमधून ११० रुग्णांना तातडीची उपचार सेवा देण्यात आली, तर गंभीर अवस्थेतील ५ रुग्णांना तत्काळ संदर्भ सेवा देऊन त्यांचे प्राण वाचविण्यात प्रशासनाला यश आले. एकूण ६,२६८ रुग्णांनी विविध स्वरूपातील आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
इतक्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित असतानाही योग्य नियोजन, वेळेवर निर्णय व प्रभावी अंमलबजावणीमुळे एकही अनुचित घटना किंवा मृत्यू घडला नाही, हे जिल्हा प्रशासनाचे उल्लेखनीय यश मानले जात आहे.
याव्यतिरिक्त पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने १४६ पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे आरोग्य विभागामार्फत शुद्धीकरण करण्यात आले. डास व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कार्यक्रमाच्या पाच दिवस आधीच कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करून धूरफवारणीही करण्यात आली होती. या कामासाठी गटविकास अधिकारी शेखर शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामपंचायतींनी प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले.
सर्व विभागांनी परस्पर संपर्क व समन्वय राखून जबाबदारीने काम केल्यामुळे भीमा कोरेगाव जयस्तंभ कार्यक्रम शांततापूर्ण, सुरक्षित व यशस्वीरीत्या पार पडला. हे नियोजन भविष्यातील मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास नागरिक व अनुयायांकडून व्यक्त केला जात आहे.
Editer sunil thorat






