
तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : भिमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी थेऊर गाव व थेऊर फाटा परिसरात जेवण, नाश्ता व चहाची मोफत सोय करण्यात आली होती. हा उपक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तसेच लोणी काळभोर येथील भिमसत्ता प्रतिष्ठान यांच्या वतीने राबविण्यात आला.
थेऊर गावात चिंतामणी विद्यालयाजवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने सुमारे दोन हजार जणांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे, दलित महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद वैराट, ग्रामपंचायत सदस्य गौतमी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते नितीन जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवत होते.
तसेच थेऊर फाटा येथे लोणी काळभोर येथील भिमसत्ता प्रतिष्ठान यांच्या वतीने आंबेडकरी अनुयायांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची सोय करण्यात आली. या उपक्रमाचा लाभ हजारो आंबेडकरी अनुयायांनी घेतला असून आयोजक व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
दोन्ही ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तसेच कुंजीरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन तुपे यांनी भेट देऊन सदर उपक्रमाबद्दल आयोजक व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
Editer sunil thorat





