
तुळशीराम घुसाळकर
हवेली (पुणे) : पूर्व हवेली तालुक्यातील अष्टापुर ग्रामपंचायत हद्दीत ९ डिसेंबर रोजी एका शेतकरी महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर सतर्क झालेल्या वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या होत्या. अखेर मंगळवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी अष्टापुर येथील खोलशेत वस्तीत एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून त्यामुळे ग्रामस्थांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र पूर्व हवेलीतील इतर अनेक गावांमध्ये अद्यापही बिबट्यांचा वावर असल्याच्या तक्रारी सुरू असल्याने नागरिकांमधील भीती पूर्णतः दूर झालेली नाही.
९ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अष्टापुर येथील अंजना वाल्मिक कोतवाल या शेतकरी महिला शेतात कामासाठी गेल्या असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर अष्टापुरसह वढु, डोंगरगाव, पेरणे ग्रामपंचायत हद्दीत तसेच विजयस्तंभ परिसरात एकापेक्षा अधिक बिबट्यांचा वावर असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केल्या होत्या. परिणामी संपूर्ण पूर्व हवेली परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.
जखमी अंजना कोतवाल यांना तातडीने उपचार व शासकीय मदत मिळावी, तसेच बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावावेत, यासाठी आमदार माऊली कटके, श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, अष्टापुर ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच पुष्पा कोतवाल, साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, श्रीहरी कोतवाल व ग्रामपंचायत सदस्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वनविभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्यानंतर वनविभागाने पूर्व हवेली परिसरात बिबट्यांचा सर्वाधिक वावर लक्षात घेऊन एकूण आठ ठिकाणी पिंजरे बसवले, त्यापैकी चार पिंजरे प्राधान्याने अष्टापुर परिसरात लावण्यात आले. यासोबतच ट्रॅकींग कॅमेरे बसवून बिबट्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत होती. तसेच थर्मल ड्रोनच्या सहाय्यानेही परिसराचा मागोवा घेतला जात होता.
अखेर आज सकाळी अष्टापुर येथील खोलशेत वस्तीत सुरेश राजाराम कोतवाल यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि सुरक्षितरित्या बिबट्याला ताब्यात घेतले. या यशस्वी कारवाईमुळे अष्टापुर व परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान, पूर्व हवेलीतील वढु, फुलगाव, पेरणे, डोंगरगाव, पिंपरी सांडस आदी गावांच्या हद्दीत अद्यापही बिबट्यांच्या पाऊलखुणा दिसत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे काही गावांतील नागरिकांमध्ये अजूनही भीती कायम असून वनविभागाने उर्वरित बिबट्यांनाही लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
या संपूर्ण मोहिमेत पुण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर वनपरिमंडल अधिकारी प्रमोद रासकर, अष्टापुरच्या वनरक्षक कोमल सकपाळ, वनसेवक बापू बाजारे यांच्यासह ग्रामस्थ, तरुण वर्ग व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दरम्यान, श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी माहिती देताना सांगितले की, ९ डिसेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अंजना कोतवाल यांना आमदार माऊली कटके यांच्या सूचनेनुसार व पाठपुराव्यामुळे वनविभागाकडून पाच लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात आली आहे. तसेच पिंजरे बसवणे, त्यामध्ये भक्ष्य ठेवणे आदी सर्व कामांमध्ये ग्रामस्थ, तरुण वर्ग व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वनविभागाला सक्रिय सहकार्य केले. या सामूहिक प्रयत्नांमुळेच अष्टापुर येथे बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले असून, अशाच एकत्रित प्रयत्नांतून पूर्व हवेलीतील उर्वरित बिबटेही लवकरच जेरबंद होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Editer sunil thorat





