
पुणे : आगामी ३१ डिसेंबर रोजी नूतन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस परिमंडळ–६ कडून विशेष तयारी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत परिमंडळ–६ कार्यालयात हॉटेल, रेस्टॉरंट आणि इव्हेन्ट व्यवस्थापनाशी संबंधित व्यावसायिकांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस परिमंडळ–६ च्या कार्यक्षेत्रातील ४८ हॉटेल मालक, चालक, मॅनेजर तसेच इव्हेन्ट मॅनेजर उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे होते.
बैठकीदरम्यान ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या. यामध्ये वेळेचे काटेकोर पालन, क्षमतेपेक्षा जास्त गर्दी न करणे, ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन, मद्यपान करून वाहन चालविण्याला प्रतिबंध, महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता, पार्किंग व्यवस्थापन, सीसीटीव्ही कार्यरत ठेवणे तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच, उपस्थित हॉटेल व इव्हेन्ट व्यवस्थापकांच्या अडी-अडचणी, शंका आणि सूचनाही ऐकून घेण्यात आल्या. कार्यक्रम परवानगी, वेळ मर्यादा, पोलिस समन्वय, वाहतूक व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा करून संबंधित समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले.
डॉ. राजकुमार शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “नूतन वर्ष स्वागत शांततामय आणि सुरक्षित वातावरणात पार पडावे, यासाठी पोलिस प्रशासन आणि व्यावसायिकांनी परस्पर सहकार्य आवश्यक आहे. नियमांचे पालन केल्यास कोणालाही अडचण येणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे.”
या बैठकीमुळे हॉटेल व्यावसायिक आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, ३१ डिसेंबरच्या रात्री कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी एकत्रितपणे जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नूतन वर्षाच्या स्वागतासाठी शहर सज्ज होत असताना, परिमंडळ–६ पोलीस प्रशासनाने आधीच दक्षता घेऊन केलेली ही बैठक कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची पायरी ठरत असल्याचे नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
Editer sunil thorat




