
हडपसर (पुणे) : दिनांक २२/१२/२०२५ रोजी ५३ वे पुणे शहर पूर्व विभाग तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन वानवडी, पुणे येथील गिरमे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील आपली कल्पकता, प्रयोगशीलता आणि संशोधन वृत्ती सादर करत लक्षणीय सहभाग नोंदवला.
या बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, नवकल्पनांना वाव देणे आणि अध्ययन अधिक रंजक बनवणे हा उद्देश ठेवण्यात आला होता. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध विज्ञान प्रकल्प, मॉडेल्स व प्रयोग पाहण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती.
या उपक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा, निबंध लेखन, वकृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः प्रश्नमंजुषा स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल, हडपसर येथील इयत्ता आठवीतील कु. तोडमल राधिका सोमनाथ आणि कु. सुतार अनुष्का आनंदराव या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गिरमे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका झीनत सय्यद, उपमुख्याध्यापिका निलिमा जगताप, विज्ञान शिक्षिका जयश्री पलंगे तसेच इतर शिक्षकवृंदांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बाल वैज्ञानिक प्रदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरले.
या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची गोडी अधिक वाढून भविष्यातील संशोधक घडण्यास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
Editer sunil thorat



