रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी, शेळी-बोकड चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक; ५ गुन्हे उघडकीस, शेतकऱ्यांना जनावरे परत…

रांजणगाव एमआयडीसी (पुणे) : रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाभुळसर खुर्द, करंजावणे, गणेगाव खालसा व वाघाळे परिसरात शेतकऱ्यांचे शेळी-बोकडे चोरीस जाण्याच्या घटनांनी चिंता वाढवली होती. मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन अज्ञात चोरट्यांकडून ही चोरी होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत दोघा चोरट्यांना अटक करून एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. चोरीस गेलेले शेळी-बोकडे शेतकऱ्यांना परत देण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी बाभुळसर खुर्द (ता. शिरूर, जि. पुणे) येथील माणिक रामभाऊ काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोकड चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अशाच स्वरूपाच्या इतर तक्रारी आल्याने एकूण पाच गुन्हे नोंदवण्यात आले. शेतकऱ्यांचे जनावरांचे नुकसान होत असल्याने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. या पथकाने शिरूर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील १५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू ठेवला.
दरम्यान, पोलीस अंमलदार योगेश गुंड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गव्हाणवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) परिसरात दोन जण मोटारसायकलवरून शेळी-बोकडे चोरत असल्याचे समोर आले. त्यानुसार सापळा रचून गणेश कैलास ब्राम्हणे (वय २१) व सुनील अण्णाभाऊ माळी (वय २४) (रा. गव्हाणवाडी) यांना अटक करण्यात आली.
तपासात आरोपींनी बाभुळसर खुर्द, कर्डिलवाडी, वाघाळे, गणेगाव खालसा व शिरूर तालुका परिसरातून शेळी-बोकडे चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून ५ बोकडे, १ शेळी, गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण १,१५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेली जनावरे शेतकऱ्यांना परत देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले (शिरूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, नितीन भोस, संदीप जगदाळे, रामेश्वर वाहेकर यांचा सहभाग होता. पुढील तपास पो. हवा. नितीन भोस, संदीप जगदाळे व नितेश हुडे करीत आहेत.
Editer sunil thorat



