परित्यक्ता महिलेवर वारंवार बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ८ लाखांची खंडणी…

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : पतीपासून घटस्फोट घेत असलेल्या परित्यक्ता महिलेच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत एका तरुणाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तब्बल ८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीत हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व वाघोली परिसरात घडली आहे.
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात २६ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून सयाजी किसन हुंबे (रा. ईट, ता. भूम, जि. धाराशिव) याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यक्रमात ओळख, नंतर वाढले संपर्क…
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता व आरोपी यांची ओळख एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. त्यानंतर आरोपी सातत्याने फोन करून तिची विचारपूस करत होता. तिच्या वैवाहिक तणावाचा व घटस्फोट प्रक्रियेचा तो वारंवार उल्लेख करीत सहानुभूती दाखवत होता.
लॉजवर नेऊन पहिला अत्याचार…
दि. ११ फेब्रुवारी रोजी आरोपीने पीडितेशी संपर्क साधून लोणी काळभोर येथे भेटण्यास बोलावले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो क्रेटा कारने तिच्या घरी आला. “तू तणावातून बाहेर पड, आपण जेवायला जाऊ,” असे सांगत त्याने तिला वाघोलीतील एका लॉजजवळ नेले. पीडितेने लॉजमध्ये जाण्यास नकार दिला असतानाही आरोपीने विश्वासात घेऊन तिला लॉजमध्ये नेले आणि जबरदस्ती बलात्कार केला, असा आरोप फिर्यादीत नमूद आहे.
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वारंवार अत्याचार…
या घटनेनंतर आरोपीने तिची समजूत काढत प्रेमाचे नाटक केले. “मी तुला आयुष्यभर साथ देईन,” अशी आश्वासने देत त्याने तिच्याशी पुन्हा पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान आरोपीने खाजगी क्षणांचे फोटो व व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; ८ लाख उकळले…
ऑक्टोबर महिन्यात आरोपीने मद्यधुंद अवस्थेत पीडितेला फोन करून तिचे नग्न फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. सामाजिक बदनामीच्या भीतीपोटी पीडितेने फोन-पे, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने अशा स्वरूपात एकूण ७ लाख ८० हजार रुपये आरोपीला दिले.
पैसे थांबताच धमक्यांचा पाऊस…
पीडितेने पैसे देणे थांबविल्यानंतर आरोपीने तिला शिवीगाळ करत फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने वाघोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल ; तपास सुरू…
तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध बलात्कार, खंडणी, धमकी व आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ शेंडगे करत आहेत.
Editer sunil thorat



