खडकवासला धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सुरू…

पुणे : खडकवासला धरणातून रब्बी हंगामासाठीचे पहिले आवर्तन मागील आठवड्यापासून सुरू करण्यात आले आहे. सध्या कालव्यातून एक हजार ५४ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून, हे आवर्तन सुमारे ४० ते ५० दिवस चालणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे. या पाण्याचा लाभ हवेली, इंदापूर, दौंड आणि बारामती तालुक्यांतील शेतकऱ्यांना होणार आहे.
यंदा समाधानकारक पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील धरणे १०० टक्के भरली होती. त्यानंतर परतीच्या पावसामुळे पाणीसाठ्यात आणखी भर पडली. त्यामुळे ग्रामीण भागातून रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने मागील आठवड्यापासून कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
सध्या खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चारही धरणांमध्ये मिळून एकूण २५ टीएमसी म्हणजेच सुमारे ८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पुरेसा पाणीसाठा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कालवा समितीच्या बैठकीशिवायच निर्णय
दरवर्षी शेतीसाठी आणि शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी किती पाणी राखीव ठेवायचे, याचे नियोजन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत केले जाते. या बैठकीस शहरी व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात.
साधारणतः ही बैठक नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होते. मात्र यंदा नोव्हेंबरमध्ये नगरपालिका निवडणुकांची, तर डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने कालवा समितीची बैठक होऊ शकली नाही. परिणामी, कालवा समितीच्या निर्णयाविनाच रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला आहे.
Editer sunil thorat



