
पुणे : गुरुवार पेठेतील पवित्र नाम देवालय चर्चमध्ये ख्रिसमस (नाताळ) हा सण मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त चर्च परिसर फुलांची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.
प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सकाळी विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रार्थनेत सहभाग घेतला. प्रभू येशूच्या जन्माचा संदेश समाजात शांतता, प्रेम व बंधुभाव निर्माण करणारा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
चर्चमध्ये प्रभू येशूच्या जन्माचा भव्य देखावा उभारण्यात आला असून तो भाविकांचे विशेष आकर्षण ठरला. तसेच सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या व्यक्तीमार्फत लहान मुलांना भेटवस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसत होता.
या कार्यक्रमाला रेव्ह. अशोक कॅरप, रेव्ह. जयंत गायकवाड, चर्चचे सचिव मनोज येवलेकर, विकास उमापती, प्राजक्ता परोळ, विजया इंदुरकर, रोझमेरी साठे, कौमुदी येवलेकर, प्रशांत सूर्यवंशी, शिरीष पाठक यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ख्रिसमसच्या निमित्ताने चर्च परिसरात आनंद, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले होते.
Editer sunil thorat




