आरपीआयची महिला नेत्या असल्याची धमकी देत २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न ; तिघांवर गुन्हा दाखल…सविस्तर बातमी वाचावी…

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर : आरपीआयची मोठी महिला नेत्या असल्याचा बनाव करून धमकावत एका व्यावसायिकाच्या मालकीची २ गुंठे जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक १६९३ येथे बुधवार, २४ डिसेंबर रोजी दुपारी २.३० ते ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हजीलाल शब्बीर शेख (वय ४५, रा. मंत्री मार्केट, हडपसर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुपाली महादेव काळभोर, अशोक आणाराव सुर्यवंशी व प्रितम सावंत (सर्व रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शेख यांनी सन २०१९ मध्ये भाऊसाहेब फुले यांच्याकडून सदर जमीन कायदेशीररित्या खरेदी केली असून, त्याची ‘क’ प्रत तयार करून सिमेंटचे कंपाऊंड बांधले आहे. गेल्या सात वर्षांपासून ही जमीन त्यांच्या ताब्यात आहे.
बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास आरोपी घटनास्थळी आले. त्यांनी शेख यांना शिवीगाळ करत सदर जमीन गायरान असल्याचा दावा केला व “तुम्ही पुन्हा येथे पाय ठेवू नका. अन्यथा तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकवू,” अशी धमकी दिली. यावेळी “मी आरपीआयची मोठी महिला नेता आहे” असे सांगून दहशत निर्माण करत शेख यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी पुढील तपास करीत आहेत.
रुपाली काळभोर यांची प्रतिक्रिया…
या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना रुपाली काळभोर यांनी सांगितले की, गट नंबर १६८६ ही सरकारी गायरान जमीन असून, त्या ठिकाणी दिव्यांग (अपंग) व्यक्ती अशोक अण्णाराव सूर्यवंशी यांना घरासाठी तात्पुरता शेड उभारण्यास मदत केली होती. मात्र या सामाजिक मदतीचा गैरसमज करून आमच्याविरोधात खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
या संदर्भात आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची भेट घेऊन गट नंबर १६८६ बाबतची सविस्तर माहिती व वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली आहे. यावर पन्हाळे साहेबांनी आम्हाला १५ दिवसांच्या कालावधीत संबंधित पुरावे व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही सर्व पुरावे सादर करून सत्य समोर आणू, असा विश्वास रुपाली काळभोर यांनी व्यक्त केला.
Editer sunil thorat



