
पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील चर्मकार समाजातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पुणे महानगरपालिकेवर जोरदार आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संत रोहिदास चर्मोद्योग व गृहनिर्माण वसाहतीसाठी पुणे महापालिकेच्या राखीव भूखंडावर घरे बांधून द्यावीत, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
केशवनगर, मुंढवा येथील सर्व्हे नं. ६ तसेच सर्व्हे नं. ९ ते १४ या राखीव भूखंडांवर चर्मकार समाजासाठी घरे बांधावीत, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान चर्मकार समाजाच्या वतीने पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून चर्मकार समाजाला हक्काचे घर मिळावे यासाठी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, महापालिकेने केवळ आश्वासन देऊन कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शासनाने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करून समाजातील गोरगरीब व वंचित घटकांना न्याय द्यावा तसेच त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी मिळावी, यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व गृहनिर्माण वसाहती अंतर्गत राखीव भूखंडावर घरे बांधून द्यावीत, असे मत संजूभाऊ बनसोड यांनी व्यक्त केले.
या मोर्चात रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे सचिव सुनील गायकवाड, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सारिका कांबळे, कार्याध्यक्ष लखन बेदरकर, भाग्यश्री शिंदे, दशरथ शिरे, अरुण पोटे, अशोक ठवाळ, ज्ञानोबा माने, शिवलाल चिंचोले, सिंधुताई शिरे, गौरी बसिरे, प्रवीण उतपुरे, नर्मदा उतपुरे यांच्यासह पुणे शहर व जिल्ह्यातील मोठ्या संख्येने चर्मकार समाजबांधव उपस्थित होते.
Editer sunil thorat




