पुणे महानगरपालिकेत अल्पसंख्यांकांना १० ते १५ उमेदवारी देण्याची शिवसेनेकडे मागणी…

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्यात यावा, तसेच पुणे शहरातून अल्पसंख्यांक समाजातील किमान दहा ते पंधरा कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी ठाम मागणी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाकडून करण्यात आली आहे.
ही मागणी अल्पसंख्यांक शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव आजीमभाई शेख आणि पुणे शहर कार्याध्यक्ष आसिफभाई खान यांनी पुणे शहर शिवसेना कार्यालयात सचिव संदीप शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
पुणे शहरात अल्पसंख्यांक समाजाची लोकसंख्या सुमारे सात ते आठ लाखांच्या घरात असूनही, शिवसेना पक्षाकडून अल्पसंख्यांकांना सातत्याने डावलले जात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व होण्यासाठी पक्षाने ठोस निर्णय घ्यावा, अशी विनंती शिवसेना नेतृत्वाला करण्यात आली आहे.
पुणे शहरातील अल्पसंख्यांक समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार असून, या समाजातील कार्यकर्त्यांनी पक्षासाठी नेहमीच प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये अल्पसंख्यांक समाजाला न्याय देत दहा ते पंधरा उमेदवारांना संधी देण्यात यावी आणि शिवसेनेने अल्पसंख्यांकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
Editer sunil thorat



