
तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : महावितरणच्या थेऊर शाखेच्या हलगर्जी व निष्काळजी कारभारामुळे हवेली तालुक्यातील मांजरी–कोलवडी शिवरस्त्यानजीक असलेल्या ग्रामपंचायत कोलवडी हद्दीतील स्टार सिटी सोसायटी येथील सुमारे २५ ते ३० घरे आठवड्यातून दोन ते तीन दिवस अंधारात राहत आहेत. सतत खंडित वीजपुरवठ्यामुळे येथील नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, महावितरणच्या उदासीनतेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भागात बसविण्यात आलेल्या विद्युत रोहित्राची क्षमता अपुरी असून त्यावर असलेल्या वीजजोडांचा भार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. वापर आणि मागणी यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने तीन फेजपैकी सातत्याने कोणताही एक फेज बंद पडतो. परिणामी नागरिकांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळत नाही. वारंवार तक्रारी करूनही त्या वेळेत नोंद घेतल्या जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
याबाबत रहिवाशांनी वायरमनशी संपर्क साधला असता, “सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश थकबाकी वसुलीवरच लक्ष देण्याचे आहेत. ती पूर्ण झाल्याशिवाय दुरुस्तीची कामे हाती घेता येणार नाहीत,” असे धक्कादायक उत्तर देण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच असंतोष पसरला आहे. विशेष म्हणजे, थेऊर येथील महावितरण शाखेत गेल्या तीन महिन्यांपासून नियमित अधिकारी नसून कुंजीरवाडीचे सहाय्यक अभियंता अलदार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मात्र त्यांच्या कडूनही या भागातील समस्यांकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. परिणामी थेऊर शाखेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे परिसरातील गावांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, या भागात सध्या ऊसतोड सुरू असून ऊसतोडणी मजूर झोपड्या उभारून राहत आहेत. हे मजूर आकडा टाकून सर्रास वीज वापरत असताना, रितसर वीजजोडणी घेतलेल्या नागरिकांना मात्र वीजपुरवठा मिळत नाही, ही बाब अधिक गंभीर आहे. रोहित्राची क्षमता कमी असल्याने वारंवार फ्यूज उडत असून रात्री-अपरात्री कधीही वीज खंडित होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
शेतीप्रधान परिसर असल्याने साप, विंचू यांचा उपद्रव असून, अलीकडे कोलवडी परिसरात बिबट्याचा वावरही आढळून आला आहे. अशा परिस्थितीत अंधारामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे.
वीज कर्मचाऱ्यांना वारंवार कळवूनही दखल घेतली जात नसल्याने, वरिष्ठांकडे तक्रार केली असता केवळ मोघम उत्तरे देऊन टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे नागरिक हतबल झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रभाकर क्षिरसागर (स्थानिक रहिवासी) म्हणाले, “गेल्या दोन दिवसांपासून रात्री आमच्या घरात वीज नाही. मात्र ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्यांना आकडा टाकून वीज दिली जाते. तीन फेजपैकी एखादा फ्यूज उडाला की ते लोक दुसऱ्या तारेवर आकडा टाकतात. आम्ही रितसर वीजजोडणी घेतली असूनही आम्हालाच वीज मिळत नाही. तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही.”
Editer sunil thorat



