
लोणी काळभोर (ता. हवेली) ; 31 डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने हॉटेल, बार, वाईन्स शॉप, बिअर शॉप, परमिट रूम व लॉज चालक-मालकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे पार पडली.
या बैठकीत पोलीस प्रशासनाने व्यावसायिकांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, हॉटेल-बारमधील सर्व कामगारांचे पोलीस व्हेरीफिकेशन करून घेणे बंधनकारक आहे. दारू पिण्याचा वैध परवाना असलेल्या ग्राहकांनाच मद्य विक्री करावी, तसेच 18 वर्षांखालील अल्पवयीनांना दारू देऊ नये,
याबाबत कठोर सूचना देण्यात आल्या. ग्राहकांशी बिलावरून वाद घालू नये, ग्राहकांना अनावश्यक वेळ रेंगाळत ठेवू नये आणि नेमून दिलेल्या वेळेतच हॉटेल-बार बंद करावेत, असे स्पष्ट आदेश देण्यात आले. ध्वनी क्षेपक वापराबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचेही यावेळी बजावण्यात आले.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचे, तसेच हॉटेलच्या आत व बाहेर, आजूबाजूच्या रस्त्यांचा परिसर कव्हर होईल अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, तसेच आपत्कालीन परिस्थितीत 112 क्रमांकावर तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
याशिवाय, हॉटेलमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे सुस्थितीत ठेवणे, नियमित सिक्युरिटी ऑडिट करून घेणे आवश्यक असल्याचे सांगत कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्यासह लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील 30 ते 35 हॉटेल, बार, वाईन्स शॉप, परमिट रूम व लॉजचे चालक-मालक उपस्थित होते. नववर्ष साजरे करताना नागरिकांची सुरक्षितता, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
Editer sunil thorat





