
तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : हवेली तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनील बाबुराव गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी उपसरपंच सविता नितीन जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
या रिक्त पदासाठी शुक्रवार, दि. २६ डिसेंबर रोजी लोणी काळभोर ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी व सरपंच नागेश काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया शांततेत पार पडली. विहित वेळेत उपसरपंच पदासाठी सुनील गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
निवड जाहीर होताच ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पॅनल प्रमुख प्रशांत काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, आबासाहेब काळभोर, माऊली काळभोर, संजय गायकवाड, हेमंत गायकवाड, संतोष भोसले, राहुल काळभोर, गणेश कांबळे, राकेश लोंढे, उद्योजक रमजान तांबोळी यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच सुनील गायकवाड यांचे अभिनंदन केले.
नवनिर्वाचित उपसरपंच सुनील गायकवाड यांची प्रतिक्रिया “ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोणतेही गटातटाचे राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन लोणी काळभोर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
सुनील गायकवाड यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांना नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Editer sunil thorat



