लोणी काळभोर मधील सराईत गुन्हेगार सद्दाम अन्सारीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई ; एक वर्षासाठी स्थानबद्ध…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाईचा सपाटा सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील कुख्यात सराईत गुन्हेगार सद्दाम इरफान अन्सारी (वय २१, रा. इंदिरानगर, कदमवाकस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) याला एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, धारदार शस्त्रांचा वापर करून गुन्हे करणारे, दहशत निर्माण करणारे सराईत आरोपी, अंमली पदार्थ विक्रेते, मटका-जुगार चालक व समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कठोर व परिणामकारक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सद्दाम अन्सारी याने वारंवार घातक धारदार शस्त्रांचा वापर करून जबर मारहाण, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, घातक शस्त्रे बाळगणे तसेच हत्यारांच्या जोरावर नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे यासारखी गंभीर गुन्हेगारी कृत्ये केल्याचे निष्पन्न झाले आहे.
यापूर्वी सद्दाम अन्सारी याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, हद्दपारीचे आदेश झुगारून देत तो पुन्हा गुन्हेगारी कृत्ये करत असल्याने सार्वजनिक सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला होता. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
ही बाब लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांनी सद्दाम अन्सारी याच्याविरोधात एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून तो मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्याकडे सादर केला. प्रस्तावाची छाननी करून मा. पोलीस आयुक्तांनी सद्दाम अन्सारी याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार सुनिल नागलोत, तेज भोसले, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, दिपक सोनवणे तसेच महिला पोलीस अंमलदार योगिता भोसुरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कठोर कारवाईमुळे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाल्याचे चित्र आहे.
Editer sunil thorat




