
पुणे : ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही २५ डिसेंबर रोजी धम्मभूमी फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन हस्ते २५ डिसेंबर १९५४ रोजी तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा येथे प्रतिष्ठापित करण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेचा यंदा ७१ वा वर्धापन दिन साजरा होत असून, या निमित्ताने विविध सांस्कृतिक, सामाजिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून समाजातील तळागाळातील घटकांच्या उन्नतीसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष शिवश्री उत्तमबापू कामठे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बहुजन समाजाच्या हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि समतेच्या लढ्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे आयोजित मराठा आरक्षण परिषदेसाठी उत्तमबापू कामठे यांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय व प्रेरणादायी ठरली आहे. समाजाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत त्यांनी केलेले कार्य समाजहिताचे असल्याने त्यांची कामगिरी समाजरत्न म्हणून गौरवण्यास योग्य असल्याचे मत कार्यक्रमाचे संयोजक, भिमपुत्र टेक्सास दादा गायकवाड (विकास प्रणेते, ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड) यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
महाराष्ट्राचे गाणसम्राट आनंद शिंदे व भिमपुत्र टेक्सास दादा गायकवाड यांच्या हस्ते उत्तमबापू कामठे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना कामठे यांनी हा सन्मान संपूर्ण बहुजन समाजाच्या संघर्षाला आणि चळवळीला समर्पित असल्याची भावना व्यक्त केली.
या सोहळ्यास प्रबोधक प्रबुद्ध साठे, सुप्रसिद्ध सिनेअभिनेते जॉनी कांबळे यांच्यासह हजारो भीमसैनिक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धम्म, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
Editer sunil thorat




