72 तासांत गुन्हा उघड ; 68 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत…
रांजणगाव एमआयडीसीतील चमाडीया गोडाऊन चोरी प्रकरण उघडकीस...

रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील चमाडीया गोडाऊनमधून आयटीसी कंपनीचे सिगारेट, बिस्किटे, साबण व इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर चोरी करणाऱ्या टोळीचा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 72 तासांत छडा लावला आहे. या कारवाईत चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 68 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी अटकेत असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
रांजणगाव एमआयडीसी येथील चमाडीया गोडाऊनमध्ये आयटीसी कंपनीचा माल साठवला जातो. येथून ट्रान्सपोर्टद्वारे डिलरकडे माल पाठवण्यात येतो. मुव्हिंग लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीची चार इलेक्ट्रिक पिकअप वाहने असून त्यामध्ये रात्रीच्या वेळेस चलनासह माल भरून ठेवला जातो. याचाच फायदा घेत दि. 17 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 6.40 वाजता अज्ञात चोरट्यांनी माल भरलेली इलेक्ट्रिक पिकअप सुरू करून गेटवर चलनाची नोंद करत तब्बल 65,98,897 रुपये किमतीचा माल चोरून नेला होता.
या प्रकरणी दिपक देवदास शिंदे (रा. लोणीकंद, मगरवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा र. नं. 478/2025 भा.न्या.संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. औद्योगिक क्षेत्रातील ही मोठी चोरी देशाच्या आर्थिक प्रगतीस धोकादायक असल्याने पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल (पुणे ग्रामीण) यांनी या गुन्ह्याकडे विशेष लक्ष देत स्वतंत्र तपास पथके नेमण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान चोरी केलेली पिकअप ही गोडाऊनपासून काही अंतरावर सोडून देण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून त्यातून 54,53,000 रुपये किमतीची सिगारेट चोरट्यांनी दुसऱ्या वाहनाद्वारे नेल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी परिसरातील 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.
दरम्यान, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ हे वाघोली परिसरात संशयित वाहनाचा शोध घेत असताना सदर वाहन कावेरी हॉटेल, वाघोली येथे डिलिव्हरी करताना आढळून आले. वाहनाचा मालक, सुपरवायझर व चालक यांची चौकशी केली असता सुपरवायझर प्रथमेश चव्हाण याने आरोपी दिपक ज्ञानेश्वर ढेंरंगे व अल्ताफ आयुब मुल्ला यांना चोरीसाठी वाहन दिल्याची कबुली दिली. त्यावरून प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण (रा. वाघोली, ता. हवेली) यास अटक करण्यात आली. तपासात चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
यातील आरोपी दिपक ज्ञानेश्वर ढेंरंगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिक्रापूर, सिंहगड रोड व लोणीकंद पोलीस ठाण्यात चोरीचे एकूण 8 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस अभिलेखातून मिळाली आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोसई अविनाश थोरात, दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, माणिक काळकुटे, अमोल रासकर यांनी पार पाडली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोसई अविनाश थोरात करीत आहेत.
Editer Sunil thorat



