
हडपसर : रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या वतीने आयोजित ‘रयत अविष्कार संशोधन प्रकल्प २०२५’ या भव्य संशोधन स्पर्धेचे आयोजन एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. संशोधन, नवकल्पना व कौशल्यविकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमास शैक्षणिक, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन चंद्रकांत दळवी (IAS निवृत्त), सचिव विकास देशमुख (IAS निवृत्त), कुलगुरू प्रिं. डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सहसचिव प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, रजिस्ट्रार डॉ. विजय कुंभार, प्रिं. डॉ. सुरेश साळुंखे, प्र. प्राचार्य डॉ. एकनाथ मुंढे, अरविंद तुपे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाबरोबरच संशोधन क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. “आजचे युग तंत्रज्ञानाचे आणि तीव्र स्पर्धेचे आहे. संशोधनाभिमुख दृष्टिकोनातूनच उज्ज्वल करिअर घडते. केवळ पदव्या मिळवून चालणार नाहीत; बदलत्या काळानुसार विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय सेवा, व्यावसायिक क्षेत्र आणि उद्योजकता या सर्व मार्गांवर आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
कुलगुरू प्रिं. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी रयत शिक्षण संस्थेच्या संशोधनाभिमुख उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन, तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि संशोधनवृत्ती विकसित करावी, असे आवाहन केले. “रयत अविष्कारसारखे उपक्रम सक्षम संशोधक घडविण्यासाठी भक्कम व्यासपीठ देतात,” असे ते म्हणाले.
या स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांतील ६८२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान ‘अविष्कार संशोधन प्रकल्प’ या गोषवार्याचे (Proceedings) प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘प्लॅन्ट अँड ह्युमन वेलफेअर’ (डॉ. विलास कांबळे व डॉ. शुभांगी वास्के), ‘मास्तरांची सावली : सहजीवनाची सामाजिकी’ (डॉ. शीतल चौरे) आणि ‘जेलर ते प्राध्यापक’ (डॉ. अतुल चौरे) या ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव विकास देशमुख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय रजिस्ट्रार डॉ. विजय कुंभार यांनी करून दिला, तर स्पर्धेच्या समन्वयक प्रो. डॉ. रंजना जाधव यांनी आभार मानले.
समारोपप्रसंगी सहसचिव प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्र. प्राचार्य प्रो. डॉ. एकनाथ मुंढे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. संजय अहिवळे, उपप्राचार्य प्रो. डॉ. किशोर काकडे, प्रो. डॉ. दिनकर मुरकुटे, डॉ. संजय जगताप, प्रो. डॉ. रंजना जाधव यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. संशोधन संस्कृतीला चालना देणारा ‘रयत अविष्कार’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात प्रेरणादायी ठरला.
Editer sunil thorat






