अंमली पदार्थ गांजाची वाहतूक करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद…
वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई; १०० किलो गांजा व चारचाकी वाहनासह सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल जप्त...

डॉ गजानन टिंगरे
वालचंदनगर (ता. इंदापूर) : अंमली पदार्थ गांजाची आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या टोळीवर वालचंदनगर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १०० किलो गांजा आणि चारचाकी वाहनासह एकूण २९ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी एका फरारी आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातून गांजा वाहतुकीचे आंतरराज्य रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास वालचंदनगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, बावडा ते बारामती (बी. के. बी. एन.) रोडने एम. एच. १२ डी. वाय. २०१२ क्रमांकाची होंडा सिटी चारचाकी गाडी गांजा वाहतूक करत बारामतीकडे येत आहे. ही माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन तात्काळ कारवाईची योजनाबद्ध आखणी केली.
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण तसेच अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या आदेशानुसार बावडा ते बारामती मार्गावर विविध ठिकाणी पोलिसांचे सापळे रचण्यात आले. दरम्यान कळंब (ता. इंदापूर) येथे संशयित चारचाकी वाहन दिसताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. पोलिसांचा पाठलाग लक्षात येताच वाहन चालकाने भरधाव वेगाने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र कळंब गावातील डी. पी. चौकात सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी वाहन अडवून तीन इसमांना ताब्यात घेतले.
वाहनाची तपासणी केली असता, डिक्कीमध्ये प्लास्टिकच्या दोन गोण्यांमध्ये २४ लाख ९८ हजार ५०० रुपये किमतीचा ९९.९४ किलो गांजा आढळून आला. तसेच पाच लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण २९ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे व दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी आपली नावे फिरोज अजिज बागवान (वय ३६, रा. कसबा बारामती), प्रदीप बाळासो गायकवाड (वय २८, रा. मळद, ता. बारामती) आणि मंगेश ज्ञानदेव राऊत (वय २९, रा. मळद, ता. बारामती) अशी सांगितली. त्यांनी हा गांजा हैदराबाद येथून इतर साथीदारांच्या मदतीने आणून बारामती येथे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार गणेश काटकर यांच्या फिर्यादीवरून वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे गु. र. जि. नं. ३६३/२०२५ अन्वये गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना मा. प्रथम वर्ग न्यायालय, इंदापूर यांनी दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासादरम्यान फरारी आरोपी अश्रम अजिज सय्यद (वय २९, रा. निरा वागज, ता. बारामती) यास ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित साथीदारांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यातून गांजा वाहतुकीचे आंतरराज्य रॅकेट उघड होण्याची शक्यता असून, पुढील सखोल तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करत आहेत.
ही यशस्वी कारवाई संदीपसिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), रमेश चोपडे (अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग), गणेश बिरादार (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग), डॉ. सुर्दशन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग) आणि अविनाश शिळीमकर (पोलीस निरीक्षक, स्था. गु. शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी — गणेश काटकर, उत्तम खाडे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, किसन बेलदार, सचिन गायकवाड, शरद पोफळे, महेश पवार, अभिजीत कळसकर, गणेश वानकर, राहुल माने व ओंकार कांबळे यांनी मोलाची भूमिका बजावली.
Editer sunil thorat



