फुरसुंगी पोलीसांकडून धडाकेबाज कामगीरी देहविक्रीचा अपव्यापार करणारे ०४ आरोपी विरुध्द गुन्हा दाखल तसेच ०४ महीलांची सुटका “

फुरसुंगी (पुणे): फुरसुंगी पोलिसांनी देहविक्रीच्या अपव्यापाराविरोधात मोठी व धडाकेबाज कारवाई करत चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या कारवाईत चार पीडित महिलांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा करण्यात आली असून, फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवली.
फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अजय म्हस्के व अक्षय नावाचे इसम मोबाईलद्वारे ग्राहकांशी संपर्क साधत होते. हे आरोपी व्हॉट्सअॅप कॉल करून ग्राहकांना महिलांचे फोटो पाठवत, त्यानंतर ग्राहकांकडून महिलांची निवड करून घेत हांडेवाडी परिसरातील विविध लॉजमध्ये महिलांना पाठवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन करत क्रिस्टल एक्झिक्युटिव्ह लॉज, मंतरवाडी–कात्रज बायपास रस्त्यालगत, ऊरळी देवाची, पुणे या ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवला. बनावट गिऱ्हाईकमार्फत संशयित आरोपींशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून महिलांचे फोटो मागवण्यात आले. त्यानुसार एकूण चार महिलांना सदर लॉजमध्ये बोलावण्यात आले. बातमी खरी असल्याची खात्री झाल्यानंतर फुरसुंगी पोलिसांनी दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १०.२० वाजण्याच्या सुमारास क्रिस्टल एक्झिक्युटिव्ह लॉजवर अचानक छापा टाकला. या छाप्यात एक बनावट गिऱ्हाईक व चार महिलांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या महिलांकडे चौकशी केली असता, अजय म्हस्के, अक्षय, सुधाकर तसेच पवन व बिंदा (पूर्ण नाव व पत्ता अद्याप अज्ञात) यांनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४२/२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४३ (२), १४३ (३), ३ (५) तसेच अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलांची तात्काळ सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस उपआयुक्त सागर कवडे (परिमंडळ – ६, पुणे शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले (लोणी काळभोर विभाग) यांच्या देखरेखीखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे, कोमल जाधव, पळसे, काळे, गायकवाड, उबाळे, कांबळे, गुरव, कामठे व इंगवले यांच्यासह फुरसुंगी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेत प्रशंसनीय कामगिरी बजावली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे हे करत असून, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू असल्याचे फुरसुंगी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Editer sunil thorat



