
तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (ता. हवेली) : जीवनात खेळातील सहभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समस्यांना सामोरे जात आपल्या ध्येयाकडे आणि खेळाकडे लक्ष केंद्रित करणारा खेळाडूच यशस्वी ठरतो. आज प्रत्येक खेळामध्ये अनेक क्रांतिकारक बदल होत असून, खेळाडूची शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व त्याला वेगळी ओळख देतात, असे प्रतिपादन हवेली तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी हेमंतकुमार खाडे यांनी केले.
हवेली तालुका प्राथमिक शिक्षक को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्त तालुकास्तरीय भव्य “शताब्दी चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन हेमंतकुमार खाडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी शिक्षकांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांतही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
या स्पर्धेत हवेली तालुक्यातील विविध विभागांतील शिक्षक संघांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. सामने अत्यंत चुरशीचे व रंगतदार झाले. अंतिम सामन्यात पश्चिम हवेलीतील सिंहगड टायगर्स संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत नगर रोडच्या शिवनेरी पँथर्स संघावर मात करून विजेतेपद पटकावले. शिवनेरी पँथर्स संघ उपविजेता ठरला, तर पूर्व हवेलीच्या पुरंदर वॉरियर्स संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
स्पर्धेच्या निमित्ताने सर्व खेळाडूंना संस्थेच्या वतीने टी-शर्टचे वाटप करण्यात आले. संस्थेचे चेअरमन दिगंबर सुपेकर यांनी सर्व खेळाडू, पंच, संयोजक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संघांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेश काळभोर यांच्या हस्ते मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच हवेली शिक्षक संघाचे आजी-माजी पदाधिकारी रमेश कुंजीर, जयवंत मोहिते व सुरेश कटके यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देऊन खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
विजेत्या संघातील सर्व खेळाडूंना संस्थेच्या संचालकांच्या हस्ते मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी हवेली तालुक्यातील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. शतक महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीलाच आयोजित करण्यात आलेल्या या भव्य क्रीडा स्पर्धेमुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचे व एकोप्याचे वातावरण निर्माण झाले. पारितोषिक वितरणानंतर संस्थेचे सचिव ग. प्र. जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
Editer sunil thorat




