
हडपसर (पुणे) : (29 डिसेंबर 2025) दिव्यांग हक्क संरक्षण कायदा आणि शासन निर्णयांना केराची टोपली दाखवत हडपसर येथील सिझन मॉलमध्ये दिव्यांग व्यक्तीकडून बेकायदेशीररित्या पार्किंग शुल्क आकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित मॉल प्रशासनावर तातडीने कारवाईची मागणी होत आहे.
मांजरी बु. येथील रहिवासी तथा जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व संस्थापक दत्तात्रय जयसिंग ननवरे (८७% शारीरिक दिव्यांग) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता ते आपल्या मित्रासोबत सिझन मॉल, हडपसर येथे खरेदीसाठी गेले असता त्यांच्या तीनचाकी वाहनासाठी पार्किंग शुल्क म्हणून २० रुपये आकारण्यात आले.
शासकीय जी.आर. व दिव्यांग हक्क कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना पार्किंग व प्रवेश शुल्कातून सूट असताना, संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता, “इथे कोणालाही सूट नाही, पैसे द्यावेच लागतील” अशा अरेरावीच्या व अपमानास्पद भाषेत उत्तर देण्यात आल्याचा आरोप ननवरे यांनी केला आहे.
या घटनेमुळे केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण दिव्यांग समाजाचा उघड अपमान झाला असून हा थेट अन्याय आहे, असे जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सिझन मॉल प्रशासनावर दिव्यांग हक्क संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सिझन मॉलसमोर “भिक मागो आंदोलन” करून तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रशासन व समाजाने या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने पाहून दिव्यांग हक्कांचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
या प्रकरणाची दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय जयसिंग ननवरे यांनी पत्रक काढून प्रसिद्ध करण्यासाठी विविध माध्यमांना दिले आहेत.
Editer sunil thorat




