
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये तिकीट वाटपावरून प्रचंड असंतोष उफाळून आला असून, या नाराजीचा थेट राजकीय फायदा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) घेत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही तास उरले असतानाच भाजपचे सहा माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील प्रभावी नेत्यांनी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला.
भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता गलांडे, माजी नगरसेवक शंकर पवार, धनंजय जाधव आणि संदीप जर्हाड यांनी तिकीट नाकारल्याने भाजपला रामराम ठोकला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ॲड. निलेश निकम, काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट आणि मनसेचे जयराज लांडगे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये प्रवेश केल्याने पुण्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत.
भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आली. निवड झालेल्यांना थेट फोन करून आणि एबी फॉर्म देत प्रक्रिया राबविल्याने तिकीट न मिळालेल्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. हाच रोष आता उघडपणे पक्षांतराच्या रूपाने बाहेर पडत असून, भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता उघड झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने त्यांच्या ताकदीत भर पडली असून, या नव्या प्रवेशांमुळे अजित पवार गट अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेले हे प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानले जात आहेत.
भाजपने शुक्रवारी (दि. २६) १०० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र ती जाहीर झाली नाही. त्यानंतर रविवारी (दि. २८) यादी जाहीर होईल, असे केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे पुणे महापालिका निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते. तरीही अपेक्षेप्रमाणे यादी न आल्याने पक्षांतर्गत नाराजी अधिक तीव्र झाली.
बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने अधिकृत यादी जाहीर न करता थेट संबंधित उमेदवारांना अर्ज भरण्याचा संदेश देण्याची रणनीती स्वीकारल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यानुसार सोमवारी (दि. २९) सुमारे ८० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अनेक प्रभागांत एकाच वेळी अनेक इच्छुक पोहोचल्याने राजकीय हालचालींना अधिकच वेग आला.
मंगळवार (दि. ३०) हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने दुपारी तीननंतरच ए व बी फॉर्म देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिकीट न मिळालेल्या ‘तगड्या’ उमेदवारांनी तत्काळ अन्य पक्षांत प्रवेश करून उमेदवारी मिळवू नये, हा यामागचा मुख्य राजकीय हिशोब असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, भाजपने राज्यातील कोणत्याही महापालिकेसाठी अद्याप अधिकृत उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. मुंबई, पुण्यासह सर्वच ठिकाणी बंडखोरी रोखण्यासाठी हीच रणनीती वापरली जात असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. या साऱ्या घडामोडींमुळे भाजपचे अधिकृत उमेदवार नेमके कोण असतील, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी दुपारी तीननंतरच खरी चित्र स्पष्ट होणार असून, तोपर्यंत पुण्याच्या राजकारणात अस्वस्थता, अनिश्चितता आणि जोरदार हालचाली सुरूच राहणार आहेत.
Editer sunil thorat



