
हडपसर (पुणे) : रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर, पुणे येथील प्र. प्राचार्यपदी प्रो. डॉ. एकनाथ मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन संस्कृती आणि प्रशासकीय कार्यक्षमतेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रो. डॉ. एकनाथ मुंढे हे अर्थशास्त्र विषयातील ज्येष्ठ व अनुभवी प्राध्यापक असून त्यांना पदवी स्तरावर २५ वर्षे आणि पदव्युत्तर स्तरावर १० वर्षांचा अध्यापनाचा समृद्ध अनुभव आहे. बँकिंग व वित्त, कृषी अर्थशास्त्र तसेच वर्तनात्मक अर्थशास्त्र ही त्यांची प्रमुख अभ्यासक्षेत्रे आहेत. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून SET (अर्थशास्त्र) परीक्षेतही त्यांनी यश मिळविले आहे.
संशोधन क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. UGC Care, Scopus तसेच Peer Reviewed जर्नल्समध्ये त्यांचे ३० शोधनिबंध प्रकाशित झाले असून प्रोसीडिंगमध्ये १० शोधनिबंध, १ पुस्तक, १२ संपादित पुस्तके आणि ८ संपादित पुस्तकांतील प्रकरणे त्यांच्या नावावर आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर ४ भारतीय पेटंट्सही प्रकाशित झालेली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक परिषद, सेमिनार, कार्यशाळा व वेबिनारमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर करून शैक्षणिक क्षेत्रात आपली ठसा उमटवला आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा येथे त्यांनी प्र. प्राचार्य म्हणून यशस्वी शैक्षणिक प्रशासनाचा अनुभव घेतला आहे. तसेच के. बी. पी. कॉलेज, वाशी (स्वायत्त) येथे अर्थशास्त्र, बिझनेस इकॉनॉमिक्स व फाउंडेशन कोर्ससाठी BoS चेअरमन म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. डी. जी. कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा (स्वायत्त) येथे बँकिंग व वित्त विषयासाठी BoS सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. आतापर्यंत २५ पेक्षा अधिक सेमिनार, कार्यशाळा व परिषदांचे आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले आहे.
या नियुक्तीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत प्रो. डॉ. एकनाथ मुंढे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Editer sunil thorat



