
हडपसर (पुणे) : प्रभाग क्रमांक १६ – हडपसर सातववाडी येथील भाजपच्या निष्ठावंत नेत्या व कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ उडवणारी राजकीय घडामोड समोर आली आहे. पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर स्मिता तुषार गायकवाड यांनी थेट बंडखोरीचा पवित्रा घेत भाजपचे चिन्ह ‘कमळ’ आपल्या फेसबुक प्रोफाइलवरून हटवत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
“मी प्रभाग १६ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आणि जिंकणार. लोक पैशाच्या जोरावर निवडणूक लढतात, मी कामाच्या जोरावर लढणार,” असा ठाम विश्वास त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.
आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून “आपली सर्वांची साथ असू द्या,” असे आवाहन करत त्यांनी लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, “माझे चिन्ह आता कमळ नाही. जे काही चिन्ह असेल ते काही दिवसांत जाहीर करेन,” असे सांगत त्यांनी भाजपशी असलेली प्रतीकात्मक नाळही तोडली आहे. या पोस्टमुळे भाजपच्या स्थानिक राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली असून, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना पुन्हा एकदा दुर्लक्षित झाल्याचा आरोप पुढे येत आहे.
पक्षासाठी सातत्याने काम करूनही तिकीट वाटपात डावलले गेलेले निष्ठावंत कार्यकर्ते हा या निर्णयाचा बळी ठरल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे. स्मिता गायकवाड यांची ही भूमिका केवळ वैयक्तिक लढा नसून, “काम करणाऱ्यांना संधी द्या” हा थेट संदेश पक्षाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.
आता स्मिता गायकवाड अपक्ष म्हणून मैदानात उतरल्याने प्रभाग १६ मधील निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित असून, निष्ठा की पैसा? काम की वशिला? असा थेट सामना मतदारांसमोर उभा ठाकणार आहे.
Editer sunil thorat




